दिल्ली | Delhi

देशात पुन्हा एकदा करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसून येत आहे. देशात गेल्या २४ तासांत रुग्णसंख्येत वाढ झाली असून चिंता वाढवणारी आकडेवारी पुन्हा एकदा समोर आली आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासात देशात तब्बल ३९ हजार ७२६ नवे करोनाबाधित सापडले आहेत. गेल्या १०० दिवसांमधील सर्वात मोठी रुग्णवाढ आहे. त्यामुळे देशभरातील एकूण करोनाबाधितांचा आकडा आता १ कोटी १५ लाख १४ हजार ३३१ इतका झाला आहे. देशात गेल्या २४ तासांमध्ये १५४ रुग्णांचा मृत्यू झाला असून २० हजार ६५४ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. सध्या देशभरात २ लाख ७१ हजार २८२ सक्रिय रुग्ण असून आतापर्यंत १ लाख ५९ हजार ३७० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तसेच ब्रिटन, दक्षिण आफ्रिका व ब्राझील या देशांत आढळलेल्या करोनाच्या नव्या स्ट्रेनचे भारतातही ४०० रुग्ण आढळले आहेत. ४ मार्चपर्यंत या स्ट्रेनचे देशात २४२ रुग्ण होते. दोन आठवड्यांत ही संख्या १५८ ने वाढली आहे.

देशात महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णसंख्या आढळून येतेय. त्यापाठोपाठ सर्वाधिक रुग्णसंख्येच्या बाबतीत केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि दिल्ली या राज्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील एकूण रुग्णसंख्या २३ लाख ९६ हजार ३४० वर पोहचलीय. यातील २१ लाख ७५ हजार ५६५ जणांनी करोनावर मात केलीय. तर १ लाख ६६ हजार ३५३ रुग्णांवर राज्यात उपचार सुरू आहेत. राज्यात आतापर्यंत ५३ हजार १३८ रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. काल (गुरुवार) दिवसभरात राज्यात २५ हजार ८३३ नवीन करोनाबाधित वाढले असून, ५८ रूग्णांच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.२२ टक्के एवढा झालेला आहे. तसेच, आज १२,१७४ रुग्ण करोनातून बरे देखील झाले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण २१,७५,५६५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९०.७९ % एवढे झाले आहे.