
दिल्ली | Delhi
देशातील करोनाची (Coronavirus) स्थिती गेल्या काही दिवसांपासून गंभीर होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. देशातील नव्या करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज ३ लाखांहून अधिक करोनाबाधित आढळून येत आहेत. यावर करोना लसीकरण हाच रामबाण उपाय असल्यामुळे देशभरात यावर भर दिला जात आहे.
दरम्यान केंद्र सरकार करोना लसीकरणासाठी नवीन नियमावली जारी केली आहे. यात आता केंद्र सरकारने सर्व राज्यांना पत्र पाठविले आहे. या पत्रात एखाद्या व्यक्तीला करोना झाला तर तीन महिन्यापर्यंत करोना लस किंवा बूस्टर डोस देता येणार नाही, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहे.
करोनातून बरे झाल्यानंतर तीन महिने लस घेता येणार नाही, असे सांगताना राष्ट्रीय लसीकरण तांत्रिक सल्लागार गट (National Technical Advisory Group on Immunisation) याबाबत सातत्याने आढावा घेत असतो. त्यात काही बदल करायचे असतील तर त्यावर विचार करून निर्णय घेतला जाईल, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.
तसेच करोनाबाधित रुग्ण बरा झाल्यानंतर किंवा लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर सुमारे ९ महिने अँटीबॉडी असते. लसीपासून मिळालेल्या प्रतिकारशक्तीवर भारतात एक अभ्यास झाला आणि जागतिक स्तरावरही संशोधन झाले. या अभ्यासातून हे स्पष्ट झाले आहे की अँटीबॉडी शरीरात सुमारे ९ महिने टिकते, असेही म्हटले आहे.
दरम्यान, करोनावरील लसीकरणासाठी कोविन पोर्टलवर आता एकाच मोबाइल क्रमांकावरून ६ जणांची नोंदणी करता येणार आहे. यासाठी मोबाइल क्रमांक किंवा आधार क्रमांकाद्वारे कोविन पोर्टवर नोंदणी करता येते. यापूर्वी कोविन पोर्टलवर एकाच मोबाइल नंबर वरून किंवा आधार क्रमांकावरून फक्त ४ जणांची नोंदणी करता येत होती. आता त्यात वाढ करून ६ जणांची नोंदणी करणं शक्य होणार आहे.
करोनाचा संसर्ग झालेल्या नागरिकांच्या लसीकरणात तीन महिन्यांचा विलंब होईल. त्यात 'प्रिकॉशन' डोसचाही समावेश आहे. यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव विकास शील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र पाठवलेले आहे.