दिल्ली । Delhi

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी करोना लसीसंदर्भात महत्त्वाची घोषणा केली होती. फक्त दिल्लीतच नाही, तर संपूर्ण देशात करोना लस मोफत दिली जाणार असल्याचे सांगत सुखद धक्का दिला. दरम्यान केंद्राकडून झालेल्या घोषणंच स्वागत होत असतानाच केंद्रीय मंत्र्यांनी पुढच्याच क्षणी घुमजाव केलं आहे.

आरोग्यमंत्र्यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, "कोविड-१९ लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात १ कोटी आरोग्यसेवकांना आणि २ कोटी फ्रंटलाईन वर्कर्सला करोनाची लस मोफत दिली जाईल. जुलै महिन्यापर्यंत प्राथमिकता असलेल्या २७ कोटी लाभार्थ्यांना लस कशी द्यावी याचा तपशील देण्यात येईल."

भारतात करोना लसीकरणाला लवकरच सुरूवात होणार आहे आणि यासाठी केंद्र सरकारकडून संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. आज (२ जानेवारी २०२०) संपूर्ण देशभरात कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रमाचे ड्राय रन होत आहे. लसीकरणाच्या ड्राय रनचा आढावा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी घेतला आणि त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की, संपूर्ण देशभरात करोनाची लस मोफत दिली जाईल. मात्र, त्यानंतर त्यांनी ट्विट करत स्पष्टीकरण दिलं आहे.

दरम्यान,सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया आणि ऑक्सफोर्डने तयार केलेल्या लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. वॅक्सिन एक्सपर्ट पॅनेलने ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाला (डीसीजीआय) मान्यता देण्याची शिफारस केली आहे. ब्रिटन आणि अर्जेंटिनानंतर ऑक्सफोर्ड लसीला मान्यता देणारा भारत तिसरा देश आहे. अॅस्ट्रोजेनिकाच्या संयुक्त विद्यमाने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया 'कोविशिल्ट' लस तयार करत आहे. ऑक्सफोर्डच्या वतीने ही लस तयार केली जात आहे. तर भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) सहकार्याने भारत बायोटेकने 'कोवॅक्सिन' तयार केली आहे, ज्याचे सादरीकरण बुधवारी पॅनेलसमोर करण्यात आले. फाईजरने आपला डेटा सादर करण्यासाठी अधिक वेळ द्यावा अशी मागणी केली. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियासह भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड आणि फायजरने देखील आतपत्कालीन वापरासाठी मंजुरी मागितली आहे. सर्वात आधी ९ डिसेंबर रोजी करोना लसीसंदर्भात सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीची बैठक झाली होती.