दिल्ली । Delhi

देशातील करोना संसर्ग अद्यापही वाढतच आहे. देशातील एकूण रूग्णसंख्या १ कोटीच्या उंबरठ्यावर पोहचली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार

मागील २४ तासांमध्ये देशभरात २२ हजार ८८९ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. तर, ३३८ रुग्णांचा मृत्यू झाला. मात्र असे जरी असले तरी करोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येतही दररोज भर पडताना दिसत आहे. कारण, याच कालावधीत देशात ३१ हजार ०८७ जणांनी करोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता ९९ लाख ७९ हजार ४४७ वर पोहचली आहे. सद्यस्थितीस देशात ३ लाख १३ हजार ८३१ एवढे अॅक्टिव्ह केसेस असून, ९५ लाख २० हजार ८२७ जणांना डिस्चार्ज मिळालेला आहे. तर आतापर्यंत १ लाख ४४ हजार ७८९ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झालेली आहे.

भारताचा करोना रिकव्हरी रेट (रुग्ण बरे होण्याचे प्रमाण) हा जगातील इतर सर्व देशांपेक्षा अधिक आहे, अशी माहिती गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. दरम्यान, अमेरिका, ब्राझील, रशिया आणि इटली या करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांतील रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण हे भारतापेक्षा कमी आहे.

आरोग्य मंत्रालयानं सांगितलं की, केंद्रासोबतच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी करोनाचा संसर्ग थोपवण्यासाठी आखलेली स्पष्ट रणनीती, सक्रियता तसेच आखले गेलेले कडक निकष याचा परिणाम भारतात सातत्याने करोनाच्या रुग्णांचा रिकव्हरी रेट वाढत राहिला तर वेगाने करोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्येत घट आणि मृत्यूदर कमी होण्यात झाला. दरम्यान, जगाचा एकत्रित रिकव्हरी रेट हा ७०.२७ टक्के इतका आहे. यामध्ये भारताचा रिकव्हरी रेट हा ९५.३१ टक्के आहे. तर अमेरिका, ब्राझील, रशिया आणि इटली या देशांचा रिकव्हरी रेट भारतापेक्षा कमी आहे, असंही मंत्रालयानं म्हटलं आहे.

महाराष्ट्रातील स्थिती

महाराष्ट्रात काल दिवसभरात ४ हजार ३५८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत १७ लाख ७४ हजार २५५ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.१४ टक्के इतके झाले आहे. काल राज्यात ३ हजार ८८० नवे रुग्ण आढळले तर ६५ मृत्यूंची नोंद झाली आहे. आज घडीला मृत्यूदर २.५७ टक्के इतका झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.