दिल्ली | Delhi

देशात कालच्या तुलनेत आज पुन्हा रुग्ण वाढले आहेत. याशिवाय मृतांचा आकडा देखील वाढला आहे. मात्र असं असलं तरी अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचं पाहायला मिळत आहे.

मागील २४ तासांमध्ये देशभरात २३ हजार ९५० नव्या करोनाबाधितांची नोंद झाली, तर ३३३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, याच कालावधीत देशात २६ हजार ८९५ जण करोनामुक्त देखील झाले आहेत. देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता १ कोटी ९९ हजार ००६ वर पोहचली आहे. आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे. सद्यस्थितीस देशात २ लाख ८९ हजार २४० सक्रिय रुग्ण असून, ९६ लाख ६३ हजार ३८२ जण करोनामुक्त झालेले आहेत. याशिवाय आतापर्यंत देशभरात १ लाख ४६ हजार ४४४ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू देखील झालेला आहे.

दरम्यान, ब्रिटनहून एअर इंडियाच्या विमानातून भारतातील वेगवेगळ्या शहरांत पोहचलेले एकूण २१ प्रवासी करोना संक्रमित आढळल्यानंतर देशाला हादरा मोठ्या बसलाय. हे प्रवासी दिल्ली, चेन्नई, अमृतसर, कोलकाता, अहमदाबाद अशा वेगवेगळ्या विमानतळांवर दाखल झालेले आहेत. त्यामुळे संबंधित राज्यांत आता कॉन्टॅक्ट ट्रेसिंगला सुरुवात करण्यात आलीय. हे प्रवासी करोना संक्रमित आढळले असले तरी हा ब्रिटनमध्ये आढळून आलेलं करोनाचं नवं स्वरुप आहे का? हे मात्र अद्याप समोर आलेलं नाही. संक्रमित व्यक्तीचे नमुने चाचणीसाठी पुण्याच्या 'नॅशनल इन्स्टीट्युट ऑफ वायरोलॉजी'कडे पाठवण्यात आलेत.

मिळालेल्या माहितीनुसार, लंडनहून दिल्लीला दाखल झालेल्या विमानातील एकूण पाच प्रवासी करोना संक्रमित आढळले होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे विमान सोमवारी रात्री ११.३० वाजता दिल्ली विमानतळावर दाखल झालं होतं. यातील पाच जण दिल्ली विमानतळावर झालेल्या चाचणीत करोना संक्रमित आढळले.