दिल्ली | Delhi

देशात पुन्हा एकदा करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसून येत आहे. देशात गेल्या २४ तासांत रुग्णसंख्येत वाढ झाली असून चिंता वाढवणारी आकडेवारी पुन्हा एकदा समोर आली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात देशात ४० हजार ९५३ नव्या कोरोनाग्रस्तांची भर पडली असून १८८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय २३ हजार ६५३ जणांनी करोनावर मात केली असून त्यांना रुग्णांलयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या १ कोटी १५ लाख ५५ हजार ३८४ इतकी झाली असून १ कोटी ११ लाख ७ हजार ३३२ जण उपचारानंतर बरे झाले आहेत. सध्या देशात २ लाख ८८ हजार ३९४ सक्रिय रुग्ण आहेत. तर मृतांची संख्या १ लाख ५९ हजार ५५८ इतकी आहे. देशभरात आतापर्यंत ४ कोटी २० लाख ६३ हजार ३९२ जणांचं लसीकरण करण्यात आलं आहे.

दरम्यान महाराष्ट्रात काल १४ हजार ४०० रुग्ण बरे होऊन घरी परतले असून एकूण २१ लाख ८९ हजार ९६५ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९०.४२ % एवढे झाले आहे. राज्यात काल २५ हजार ६८१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून ७० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.२० % एवढा आहे. तर राज्यात १ लाख ७७ हजार ५६० रुग्ण सक्रिय आहे.

वाढत्या रुग्णसंख्येवर लॉकडाऊनचा पर्याय?

राज्यातील वाढत्या रुग्णसंख्येवर लॉकडाऊनचा पर्याय असेल का? या सर्वसामान्यांना पडलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नंदुरबार येथे उत्तर दिले. त्यांनी म्हंटल आहे कि, 'राज्यात करोनाचा धोका पुन्हा वाढला आहे. मागील सप्टेंबर महिन्यातील उच्चांक करोना रुग्णसंख्येने ओलांडला आहे. ही चिंतेची बाब आहे. या परिस्थितीत लॉकडाऊन करणं हा पर्याय आहे. परंतु, लगेचच लॉकडाऊन लावण्यात येणार नाही. आता लोक मास्क वापरु लागले आहेत. लोकांकडून अशाच सहकार्याची मला अपेक्षा आहे. नागरिकांनी नियमांचे न पालन केल्यास लवकरच कठोर निर्णय घ्यावा लागेल,' असे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच, लस पूर्णपणे सुरक्षित असून लस घेण्याचेही आवाहनही त्यांनी जनतेला केले. दरम्यान, परदेशातला विषाणूचा स्ट्रेन महाराष्ट्रात अद्याप आढळलेला नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.