थोडासा दिलासा! देशात तीन लाखांहून अधिक करोनामुक्त, दैनंदिन रुग्णसंख्येतही घट

मात्र मृतांची संख्या चिंता वाढवणारी
थोडासा दिलासा! देशात तीन लाखांहून अधिक करोनामुक्त, दैनंदिन रुग्णसंख्येतही घट

दिल्ली | Delhi

करोनाची दुसरी लाट आणि नव्या स्ट्रेनने भारतात चांगलाच कहर केला आहे. एकीकडे केंद्र-राज्यांकडून विविध उपाययोजना केल्या जात असून, करोनाच्या संसर्गाच्या प्रसाराला अद्यापही ब्रेक लागलेला नाही. मागील दहा दिवसांपासून देशात दररोज तीन लाखाहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे.

शुक्रवारी हा आकडा चार लाखाच्या पार गेला होता. मात्र, आता काही प्रमाणात दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. मागील चोवीस तासात तीन लाखांहून अधिक करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. पहिल्यांदाच एकाच दिवसात एवढ्या मोठ्या संख्येनं रुग्ण बरे झाले आहेत. तर, रुग्णसंख्येतही शुक्रवारच्या तुलनेत घट झाली आहे. मात्र दुसरीकडे मृतांच्या आकड्यात कोणतीही घट होताना दिसत नाही.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत आतापर्यंतच्या सर्वाधिक मृत्यूंची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत ३ हजार ६८९ रुग्णांनी आपला जीव गमावला असून हा आतापर्यंतचा उच्चांक आहे.

देशात गेल्या २४ तासांत ३ लाख ९२ हजार ४८८ नवे करोना रुग्ण आढळले असून यासोबत देशातील करोना रुग्णसंख्या १ कोटी ९५ लाख ५७ हजार ४५७ इतकी झाली आहे. तर दुसरीकडे आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २ लाख १५ हजार ५४२ वर पोहोचली आहे.

दरम्यान देशात गेल्या २४ तासात ३ लाख ७ हजार ८६५ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. या संख्येसह करोनावर मात करणाऱ्यांची संख्या १ कोटी ५९ लाख ९२ हजार २७१ वर पोहचली आहे.

महाराष्ट्रातील स्थिती काय?

राज्यात शनिवारी ८०२ रूग्णांचा मृत्यू झाला असून, ६३ हजार २८२ नवीन करोनाबाधित आढळून आले. सध्या राज्यातील मृत्यू दर १.४९ टक्के एवढा आहे. ६१ हजार ३२६ रुग्ण बरे देखील झाले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण ३९,३०,३०२ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ८४.२४ टक्के आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com