Coronavirus : देशात गेल्या २४ तासात रुग्णसंख्येसह आतापर्यंतच्या सर्वाधिक मृत्यूंची नोंद

महाराष्ट्रातील स्थिती काय?
Coronavirus : देशात गेल्या २४ तासात रुग्णसंख्येसह आतापर्यंतच्या सर्वाधिक मृत्यूंची नोंद

दिल्ली | Delhi

करोना महामारीने संपूर्ण देशात थैमान घातलं आहे. देशात करोनाची दुसरी लाट आता भयंकर होत चालली आहे.

दररोज तीन लाखांहून अधिक नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद होताना दिसत आहे. यामुळे देशात सक्रीय रुग्णांचा आकडादेखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दरम्यान देशात गेल्या २४ तासांत आतापर्यंतच्या सर्वाधिक रुग्णसंख्येसह मृत्यूंची नोंद झाली आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात देशात तब्बल ३ लाख ६० हजार ९६० नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील एकूण रुग्ण संख्या १ कोटी ७९ लाख ९७ हजार २६७ इतकी झाली आहे.

तसेच गेल्या २४ तासात २ लाख ६१ हजार १६२ जण उपचारानंतर बरे झाले असून ३ हजार २९३ जणांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत १ कोटी ४८ लाख १७ हजार ३७१ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशात सक्रिय रुग्नांची संख्या २९ लाख ७८ हजार ७०९ इतकी झाली असून मृतांची संख्या २ लाख ०१ हजार १८७ इतकी झाली आहे.

देशात आतापर्यंत १४ कोटी ७७ लाख नागरिकाचे लसीकरण झालं असून, त्यापैकी ९३ लाख ४७ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीची पहिली मात्रातर ६१ लाखांपेक्षा अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीची दुसरी मात्रा देण्यात आली आहे. १ कोटी २२ लाखांपेक्षा जास्त आघाडीवरच्या कर्मचाऱ्यांना पहिली मात्रा तर ६५ लाखांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना लसीची दुसरी मात्रा देण्यात आली आहे.

देशात १६ जानेवारीपासून जगातील सर्वात मोठी करोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु झाली आहे. काल एका दिवसात देशात रात्री ८ वाजेपर्यंत २४ लाख ५ हजार लाभार्थ्यांना लस देण्यात आली. केंद्र सरकारने आतापर्यंत सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना मिळून १५ कोटी लसींच्या मात्रा मोफत दिल्या असून, १ कोटींपेक्षा जास्त मात्रा अजूनही सर्व राज्यांकडे शिल्लक असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

महाराष्ट्रातील स्थिती काय?

राज्यात करोना संसर्ग झपाट्याने वाढत असला तरी करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या देखील आता हळूहळू वाढत असल्याचे समोर येत आहे. काल (मंगळवार) दिवसभरात राज्यात ६७ हजार ७५२ रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. तर, ६६ हजार ३५८ नवीन करोनाबाधित वाढले असून, ८९५ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण(रिकव्हरी रेट) ८३.२१ टक्के आहे. तर, राज्यात आजपर्यंत ३६,६९,५४८ रूग्ण करोनातून बरे होऊन घरी परतले आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com