ऑक्सिजन पुरवठ्यासाठी केंद्र सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये

पंतप्रधान मोदींनी दिले 'हे' आदेश
ऑक्सिजन पुरवठ्यासाठी केंद्र सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये

दिल्ली | Delhi

करोनाने देशात प्रचंड थैमान घातले आहे. सलग दोन दिवसांपासून २ लाखांहून अधिक रुग्णवाढ होत असून वैद्यकीय साधनांचीही कमतरता भासू लागली आहे. तसेच आरोग्य यंत्रणा पूर्णत: विस्कळीत झाली आहे. अनेक ठिकाणी ऑक्सिजन बेड्स उपलब्ध होत नसल्याच्या बातम्या समोर येत आहेत. तर काही ठिकाणी ऑक्सिजन सिलिंडर मिळत नसल्याने चिंता वाढली आहे.

यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आढावा बैठक घेतली. पंतप्रधानांनी सध्याच्या ऑक्सिजन साठा, निर्मिती आणि पुरवठ्याची माहिती घेतली. यावेळी बैठकीला आरोग्य मंत्रालय, स्टील मंत्रालय, रस्ते आणि परिवहन मंत्रालयासह विविध विभागाचे मंत्री आणि अधिकारी सहभागी झाले होते. पंतप्रधानांनी सर्व मंत्रालयांना राज्य सरकारांसोबत योग्य प्रकारे समन्वय साधण्याचे निर्देश दिले.

तसेच या बैठकीत देशातील ऑक्सिजन पुरवठा आणि ते पुरवण्यासाठी उपाययोजना आखण्यात आल्या. वाढती मागणी पाहता ऑक्सिजन निर्मिती करण्यावर भर देण्यात आला आहे. त्याचबरोबर स्टील प्लांटना देण्यात येण्याऱ्या अतिरिक्त ऑक्सिजनचा पुरवठा आरोग्य वापरासाठी करण्यास सांगितलं आहे.

देशात ऑक्सिजन पुरवठा करण्याऱ्या टँकर्सना सूट देण्यासही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. कोणतीही अडवणूक न करता देशात ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास सांगितलं आहे. ड्रायव्हरर्सनंही दोन शिफ्टमध्ये काम करत योग्य ठिकाणी पुरवठा करण्याची जबाबदारी पार पाडावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

सिलिंडर भरण्याऱ्या कंपन्यांनी २४ तास काम करण्याची तयारी ठेवावी अशी विनंतीही केली आहे. तसेच नायट्रोजन आणि अरगोन पुरवठा करण्याऱ्या टँकर्सनाही ऑक्सिजन पुरवठा करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

दरम्यान, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, दिल्ली, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, पंजाब, हरयाणा आणि राजस्थान अशा अनेक राज्यांना मेडिकल ऑक्सिजन तुटवड्याचा प्रश्न भेडसावत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com