करोनाच्या नव्या वेरियंटमुळे खळबळ; ब्रिटन पाठोपाठ 'या' देशांनी घेतला मोठा निर्णय

करोनाच्या नव्या वेरियंटमुळे खळबळ; ब्रिटन पाठोपाठ 'या' देशांनी घेतला मोठा निर्णय

मुंबई l Mumbai

करोनाच्या दोन तडाख्यानंतर सावरत असतानाच आता करोनाच्या नव्या व्हेरिएंटने झोप उडवली आहे. दक्षिण आफ्रिकेत करोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. हा व्हेरिएंट डेल्टा व्हेरिएंटपेक्षाही भयानक असल्याने आता जगभरातच चिंतेचं वातावरण आहे.

करोनाच्या नव्या व्हेरिएंट संदर्भात नवीन माहिती देताना दक्षिण आफ्रिकेच्या शास्त्रज्ञांनी सांगितले की, 'दक्षिण आफ्रिकेत मल्टिपल म्युटेशन क्षमता असलेला करोनाचा एक नवा व्हेरिएंट आढळला आहे. दक्षिण आफ्रिकेतील करोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यानंतर या नव्या व्हेरिएंटची माहिती समोर आली आहे. वायरोलॉजिस्ट ट्यूलिओ जी ओलिवेरा यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती आली आहे.

करोनाच्या नव्या वेरियंटला वैज्ञानिकांनी B.1.1.529 असे नाव दिले आहे. तो वेरियंट ऑफ कंसर्न असल्याचे ही म्हटले. त्याचसोबत डब्लूएचओने आपत्कालीन बैठक बोलावण्याची मागणी केली आहे. ओलिवेरा यांनी पुढे म्हटले की, दक्षिण अफ्रिकेत करोनाच्या नव्या रुग्णांच्या वाढत्या संख्येमागील मुख्य कारण म्हणजे मल्टीमल म्युटेशन असणारा हा वेरियंट आहे.

दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या नव्या व्हेरिएंटनंतर ब्रिटनने सहा आफ्रिकन देशांसोबतची विमानसेवा अनिश्चित काळासाठी रद्द केली आहे. त्याचबरोबर ब्रिटनच्या 'युके हेल्थ सिक्युरिटी एजन्सी'ने (UKHSA) करोनाच्या नव्या व्हेरिएंटला अंडर इन्व्हेस्टिगेशन म्हणून घोषित केलं आहे. तसेच ब्रिटन पाठोपाठ इटली आणि जर्मनी या देशांनी सुद्धा विमानसेवा अनिश्चित काळासाठी रद्द केली आहे.

दरम्यान, भारतात सुद्धा दक्षिण अफ्रिका, हॉगकाँग आणि बोत्सवाना येथून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्याचे निर्देशन दिले गेले आहेत. तर केंद्र सरकारने राज्यांना विशेष सावधगिरी बाळगण्यास सांगितली आहे. राज्यांना असे सांगण्यात आले आहे की, त्यांनी दक्षिण अफ्रिका, हॉगकाँग आणि बोत्सवाना येथून येणाऱ्या प्रवाशांची नीट तपासणी करावी. कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करु नये.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com