दिल्ली | Delhi

देशात करोना पुन्हा एकदा स्फोटक रूप घेऊ लागला आहे. दोन आठवड्यांपासून देशातील करोना रुग्णसंख्या सतत वाढत...

असून केंद्र सरकार वारंवार लोकांना मास्क वापरणे तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन करत आहे. मात्र काही ठिकाणी या नियमांचे पालन योग्य पद्धतीने होताना दिसत नाही.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांमध्ये तब्बल ६२ हजार २५८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. एका दिवसात लागण होण्याचा हा या वर्षातील उच्चांक आहे.

धक्कादायक गोष्ट म्हणजे यापैकी ६० टक्के म्हणजे ३६ हजार ९०२ रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रातील आहेत. १६ ऑक्टोबरनंतर पहिल्यांदाच देशात इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडले असून यासोबत रुग्णसंख्या १ कोटी १९ लाखांवर पोहोचली आहे.

शुक्रवारी देशात ५९ हजार ११८ रुग्ण आढळले होते. शुक्रवारच्या तुलनेत देशात शनिवारी रुग्णसंख्या ५.३ टक्क्यांनी वाढली आहे. यासोबत देशात गेल्या २४ तासात २९१ रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण रुग्णसंख्या १ लाख ६१ हजार २४० इतकी झाली आहे

याशिवाय ३० हजार ३८६ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशात आतापर्यंत १ कोटी १२ लाख ९५ हजार २३ जण करोनामुक्त झाले आहेत. देशात सध्याच्या घडीला ४ लाख ५२ हजार ६४७ सक्रिय रुग्ण आहेत.

दरम्यान ही रुग्णवाढ देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये तर करोना रुग्णांची संख्या गेल्यावर्षीपेक्षा वेगाने वाढत आहे.

गेल्यावर्षीच्या मार्च महिन्यात पिंपरी-चिंचवडमध्ये रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण ६ ते ८ टक्के होते. पण यंदाच्या वर्षी मार्च महिन्यात हाच पॉझिटिव्हिटी रेट ४० टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे.

राज्यात काल (26 मार्च) दिवसभरात ३६ हजार ९०२ नवे करोना रुग्ण आढळले. तर एकूण १७ हजार १०९ रुग्ण करोनातून बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कालची आकडेवारी मिळून राज्यात आतापर्यंत २३ लाख ५६ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ८७.२ टक्क्यांवर आले आहे. काल दिवसभरात करोनामुळे एकूण ११२ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील मृत्यूदर सध्या २.०४ टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा ३६ लाख ३७ हजार ७९५ वर पोहोचला आहे.