करोनाची धडकी भरवणारी आकडेवारी!

करोनाची धडकी भरवणारी आकडेवारी!

दिल्ली | Delhi

देशात करोनाची दुसरी लाट आता भयंकर होत चालली आहे. देशात करोनामुळे प्राण गमावलेल्यांचा आकडा दिवसागणिक वाढताना दिसत आहे. दररोज तीन लाखांहून अधिक नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद होताना दिसत आहे.

यामुळे देशात सक्रीय रुग्णांचा आकडादेखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परंतु, यामध्ये दिलासा देणारी बातमी म्हणजे सक्रीय रुग्णांसोबत करोनापासून मुक्त होणार्‍यांचे प्रमाणदेखील वाढतच आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात देशात तब्बल ३ लाख ४९ हजार ६९१ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील एकूण रुग्ण संख्या १ कोटी ६९ लाख ६० हजार १७२ इतकी झाली आहे.

Title Name
१ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना करोना लस; कधी व कुठे कराल नोंदणी?
करोनाची धडकी भरवणारी आकडेवारी!

तसेच गेल्या २४ तासात २ लाख १७ हजार ११३ जण उपचारानंतर बरे झाले असून २ हजार ७६७ जणांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत १ कोटी ४० लाख ८५ हजार ११० रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.

देशात सक्रिय रुग्नांची संख्या २६ लाख ८१ हजार ७५१ इतकी झाली असून मृतांची संख्या १ लाख ९२ हजार ३११ इतकी झाली आहे. तसेच देशात आतापर्यंत १४ कोटी ०९ लाख १६ हजार ४१७ जणांचं लसीकरण करण्यात आलं आहे.

महाराष्ट्रातील स्थिती काय?

महाराष्ट्रात करोनाची सक्रिय रुग्णसंख्या वाढली असून, गेल्या महिनाभरात त्यात तिपटीने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. २१ मार्च रोजी राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या २ लाख १० हजार १२० एवढी होती. ती २३ एप्रिल रोजी ६ लाख ९१ हजार ८५१ एवढी झाली आहे.

सक्रिय रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे चिंता वाढल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदवले. राज्यातील सक्रिय रुग्णांचा आकडा आता सात लाखांच्या उंबरठ्यावर आहे. सक्रिय रुग्णसंख्येत महाराष्ट्र आघाडीवर असून, इतर राज्यांच्या तुलनेत राज्यातील सक्रिय रुग्णांचे प्रमाण ५५ टक्के असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या रोजची नोंद ६० हजारांच्या आसपास होत असताना सक्रिय रुग्णसंख्येत दररोज ६ ते १० हजारांनी भर पडत आहे.

Title Name
Good News : ‘कोव्हॅक्सीन’ लस ‘डबल म्युटंट’ करोनाविरोधात प्रभावी - आयसीएमआर
करोनाची धडकी भरवणारी आकडेवारी!

दरम्यान, देशात करोनाचा प्रसार वाढू लागलेला असताना रेमडेसिविर इंजेक्शन, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर यांचा तुटवडा जाणवू लागला आहे. अनेक भागांमध्ये ऑक्सिजनच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे रुग्णांचे जीव गेल्याच्या देखील घटना घडल्या आहेत. या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात आणि देशाच्या इतरही न्यायालयांमध्ये खटले देखील सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांनी केंद्र सरकारने पुरेसा ऑक्सिजन आणि रेमडेसिविरचा साठा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

'या' नऊ देशांची भारतीय उड्डाणांवर बंदी

दरम्यान कॅनडाने भारत व पाकिस्तानात करोनाची वाढती लक्षणे लक्षात घेऊन या देशांंतील प्रवासावर ३० दिवसांसाठी बंदी आणली आहे. गुरुवारपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली. ब्रिटनमध्ये भारतीय व्यक्तीच्या प्रवेशासाठी रेड लिस्ट नियम लागू केला जाईल. गुरुवारी ब्रिटनमध्ये इंडियन व्हेरिएंटचे ५५ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे भारतातून ब्रिटनमध्ये येण्यास मनाई करण्यात आली आहे. दिल्लीहून मायदेशी जाणारे किंवा ब्रिटन किंवा आयर्लंडचे नागरिक १० दिवस हाॅटेलमध्ये क्वाॅरंटाइन राहतील.

दुबई, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, ओमान, हाँगकाँग, फ्रान्सनेही भारताच्या उड्डाणांवर बंदी घातली आहे. अमेरिका, इस्रायलने भारतातून येणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. सिंगापूरमध्ये १४ दिवस क्वाॅरंटाइन झाल्यानंतर सात दिवसांपर्यंत घरात अनिवार्य रूपाने राहावे लागेल.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com