दिल्ली l Delhi

देशात १६ जानेवारीपासून करोना लसीकरण मोहिमेला सुरूवात झाली आहे. कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन लसींना आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आल्यानंतर आता या लसीचा दुसरा डोस देण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे.

करोना लसीचा दुसरा डोस १३ फेब्रुवारीपासून दिला जाणार असल्याची माहिती निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल (Dr. V. K. Paul) यांनी पत्रकार परिषदेत दिली. करोना प्रतिबंधक देशव्यापी लसीकरण मोहिमेच्या (Vaccination Drive) पहिल्या टप्प्याची सुरुवात १६ जानेवारीपासून करण्यात आली होती. आरोग्य कर्मचाऱ्यांना आतापर्यंत केवळ पहिलाच डोस देण्यात आला आहे, अशी माहितीही डॉ. पॉल यांनी दिली.

दरम्यान काल (४ फेब्रुवारी) दुपारी १.३० वाजेपर्यंत देशात लस घेतलेल्यांचा आकडा ४५ लाख ९३ हजार ४२७ पर्यंत पोहचला आहे. भारतामध्ये मध्य प्रदेश, केरळ, राजस्थान, सिक्कीम, त्रिपुरा, मिझोराम, लक्षद्वीप, ओडिशा, बिहार, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, अंदमान निकोबार या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये ५०% पेक्षा अधिक आरोग्य कर्मचार्यांना लस देण्यात आली आहे.

भारतामध्ये पहिल्या टप्प्यांत आरोग्य कर्मचारी, कोविड योद्धे, पोलिस यांना लस देण्यात आली आहे. देशात सध्या उपलब्ध असलेल्या लसींमध्ये प्रत्येकाला २ डोस देणं आनिवार्य आहे. त्यामुळे फिला डोस घेतल्यानंतर आता दुसरा डोस घेऊनच हा कोर्स पूर्ण केला जाऊ शकतो आणि शरीरात करोना वायरस लसीविरूद्ध अॅन्टीबॉडीज तयार होण्यास मदत होईल असे सांगण्यात आल्यानंतर दुसरा डोस देखील घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार देशात दुसर्या टप्प्यातील लसीकरणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सारे खासदार, आमदार, मुख्यमंत्र्यांचा समावेश होणार आहे.