Corona Update : देशात गेल्या २४ तासात ३८ हजार नवे रुग्ण, महाराष्ट्रातील स्थिती काय?
Corona

Corona Update : देशात गेल्या २४ तासात ३८ हजार नवे रुग्ण, महाराष्ट्रातील स्थिती काय?

देशात आतापर्यंत किती जणांचं लसीकरण?

दिल्ली l Delhi

देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेना (Corona second wave) देशात हाहाकार माजवला होता. करोना रुग्णसंख्येने (Covid19 Patient) मोठा उच्चांक गाठला होता.

दरम्यान देशातील नव्या करोना रुग्णांची संख्या घटत असल्याने करोनाची दुसरी लाट आता बर्‍यापैकी नियंत्रणात आली आहे. भारतात गेल्या दोन दिवसांपासून नवीन करोना बाधितांच्या संख्येची स्थिती स्थिर आहे. देशात दररोज करोनाची सुमारे ४० हजार नवीन प्रकरणे समोर येत आहेत.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ३८ हजार १६४ नवे करोना रुग्ण (New Covid19 Patient) आढळले असून ४९९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच देशात गेल्या २४ तासात ३८ हजार ६६० रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.

देशात अद्याप ४ लाख २१ हजार ६६५ करोनाबाधित उपचार घेत आहेत. आतापर्यंत एकूण ४ लाख १४ हजार १०८ जणांचा मृत्यू झाला आहे. चांगली गोष्ट अशी की आतापर्यंत एकूण ३ कोटी ०३ लाख ०८ हजार २७ हजार लोकांनी करोनावर मात केली आहे. तर देशात आतापर्यंत ३ कोटी ११ लाख ४४ हजार २२९ लोकांना करोना संसर्ग झाला आहे.

मात्र सध्या करोनाबाधितांच्या दैनंदिन आकडा कमी झाल्याचं पाहायला मिळत असले तरी देशात दररोज सरासरी ४० हजार करोनाबाधितांची नोंद करण्यात येत आहे. परंतु, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जुलैच्या गेल्या दोन आठवड्यांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव फारसा कमी झाला नाही.

देशात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेदरम्यान काल दिवसभरात देशातल्या १३ लाख ६३ हजार १२३ नागरिकांनी करोना प्रतिबंधक लस टोचून घेतली. त्यापैकी पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या ९ लाख १३ हजार ४५६ आहे तर ४ लाख ४९ हजार ६६७ नागरिकांनी करोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला. त्यामुळे आता देशातल्या लस घेतलेल्या नागरिकांची एकूण संख्या ४० कोटी ६४ लाख ८१ हजार ४९३ वर पोहोचली आहे.

महाराष्ट्रातील स्थिती काय? (Maharashtra corona update)

राज्यातील करोनाबाधितांच्या संख्येत वाढ सुरूच आहे. करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे एकीकडे सांगितले जात असले, तरी देखील अद्यापही राज्यात मोठ्यासंख्येने नवीन करोनाबाधित आढळून येत आहेत. शिवाय, करोनाबाधितांच्या मृत्यू संख्येतही रोज भर पडतच आहे. राज्यात काल दिवसभरात ९ हजार नवीन करोनाबाधित आढळून आले असून, १८० रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. तर, ५ हजार ७५६ रूग्ण करोनामुक्त झाले आहेत. राज्यात एकूण ५९ लाख ८० हजार ३५० करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.२४ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०४ टक्के एवढा आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com