Coronavirus : देशात दैनंदिन रुग्णसंख्येत चढ-उतार कायम; ४० हजारांहून अधिक रुग्णांची नोंद

Coronavirus : देशात दैनंदिन रुग्णसंख्येत चढ-उतार कायम; ४० हजारांहून अधिक रुग्णांची नोंद

मृतांच्या संख्येत मोठी वाढ

दिल्ली | Delhi

देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेना (Corona second wave) देशात हाहाकार माजवला होता. करोना रुग्णसंख्येने (Covid19 Patient) मोठा उच्चांक गाठला होता. दरम्यान देशातील नव्या करोना रुग्णांची संख्या घटत असल्याने करोनाची दुसरी लाट आता बर्‍यापैकी नियंत्रणात आली आहे. मात्र देशात गेल्या २४ तासात करोनाबाधितांचा आकडा पुन्हा एकदा वाढल्याने देशाची चिंता वाढली आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ४२ हजार ०१५ नवे करोना रुग्ण आढळले असून ३ हजार ९९८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. गेल्या ३९ दिवसांमधील ही सर्वाधिक आकडेवारी आहे. आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ४ लाख १८ हजार ४८० वर पोहोचली आहे. तसेच देशात गेल्या ३६ तासात ४२ हजार ९७७ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. या संख्येसह करोनावर मात करणाऱ्यांची संख्या ०३ कोटी ०३ लाख ९० हजार ६८७ वर पोहचली आहे. तसेच देशात सध्या ४ लाख ०७ हजार १७० रुग्णांवर उपचार आहेत.

दरम्यान देशातील करोना रुग्णसंख्येत होणारी घट पाहता नागरिक काहीसे निर्धास्त झाले आहे. त्यामुळे पर्यटन स्थळी होणारी गर्दी, करोना नियमांचे उल्लंघन अशा अनेक घटना समोर आल्या. मात्र कोविड-19 (Covid-19) संकट अद्याप पूर्णपणे टळलेले नाही. करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. त्यात नागरिकांचा हलगर्जीपणा यामुळे धोका अधिक वाढू शकतो. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने पुढील १२५ दिवस महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे. तसंच सतर्क राहण्याचा इशाराही दिला आहे.

महाराष्ट्रातील स्थिती काय? (Maharashtra corona update)

राज्यातील करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असल्याचे दिसत आहे. शिवाय, दररोज मोठ्यासंख्येने रूग्ण करोनातून बरे देखील होत आहेत. मात्र असे जरी असले तरी देखील अद्यापही करोनाबाधितांच्या मृत्यू संख्येत रोज भर पडतच आहे. दररोज आढळणारी करोनाबाधितांची संख्या ही मागील काही दिवसांमध्ये करोनामुक्त झालेल्यांपेक्षा कमी आढळून येत आहे. काल दिवसभरात राज्यात ७ हजार ५१० रूग्ण करोनातून बरे झाले असून, ६ हजार ९१० नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. याशिवाय, १४७ करोनबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com