अयोध्येतील राममंदिराचे बांधकाम तीन-साडेतीन वर्षांत पूर्ण होणार

अयोध्येतील राममंदिराचे बांधकाम तीन-साडेतीन वर्षांत पूर्ण होणार

भूमिपूजनासाठी 3 किंवा 5 ऑगस्टचा मुहूर्त

अयोध्या | Ayodhya - अयोध्येतील राममंदिराचे बांधकाम तीन-साडेतीन वर्षांत पूर्ण होईल अशी माहिती विश्वस्त मंडळाचे महासचिव चंपत राय यांनी दिली. अयोध्येत भगवान श्रीरामाचे भव्य मंदिर उभारण्याच्या मुद्यावर रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र विश्वस्त मंडळाची शनिवारी दुपारी बैठक झाली. भूमिपूजनासाठी 3 व 5 ऑगस्ट असे दोन मुहूर्त काढण्यात आले असून, यातील एका मुहूर्तावर काम सुरू झाल्यानंतर तीन वर्षांच्या आत अयोध्येत भव्य मंदिर उभारण्यावर आणि मंदिराची उंची वाढविण्यावर या बैठकीत एकमत झाले.

विश्वस्त मंडळाच्या बैठकीनंतर मुहूर्ताच्या या दोन्ही तारखांची माहिती पंतप्रधान कार्यालयाला देण्यात आली. मुहूर्ताबाबत अंतिम निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे कार्यालय घेतील असेही बैठकीत ठरले.

मंदिराची उंची वाढविण्यासोबतच बांधकामाशी संबंधित इतर महत्त्वाच्या मुद्यांवरही बैठकीत चर्चा झाली. अयोध्येतील विश्रामगृहात दुपारी तीन वाजता सुरू झालेली बैठक सुमारे अडीच तास चालली. मंदिराच्या नकाशात बदल करण्यात येणार असून, आता मंदिरात तीन ऐवजी पाच घुमट असणार आहेत. नकाशात मंदिराची जी उंची निश्चित करण्यात आली आहे, ती वाढविण्याचा निर्णयही घेण्यात आला, अशी माहिती विश्वस्त मंडळाचे महासचिव चंपत राय यांनी बैठकीनंतर दिली.

करोनाचे संकट आटोक्यात आल्यानंतर मंदिरासाठी निधी गोळा करण्याची मोहीम हाती घेण्यात येईल. भूमिपूजन झाल्यानंतर तीन ते साडेतीन वर्षांत मंदिराचे बांधकाम पूर्ण झालेले असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्राही बैठकीत उपस्थित होते. त्यांच्यासोबत स्थापत्य अभियंत्यांचा एक गट मंदिर बांधकामाच्या बारीकसारीक गोष्टींवर लक्ष देण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून अयोध्येतच मुक्कामी आहे. याशिवाय, मंदिराचे प्रारूप तयार करणारे चंद्रकांत सोमपुरा आणि त्यांचे पुत्र निखिलही अयोध्येतच आहेत.

भूमिपूजन मोदींच्या उपस्थितीत

राममंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी उपस्थित राहावे, असा विश्वस्त मंडळाचा आग्रह असून, या मुद्यावर मंडळातील सदस्य लवकरच मोदी यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com