दिल्ली । Delhi

देशात कोरानाचा वेग मंदावला आहे. गेल्या २४ तासात देशात करोनाचे १५५ रुग्ण दगावले आहेत. तर १४ हजाराहून अधिक करोना रुग्ण आढळून आले आहेत. ही आकडेवारी गेल्या काही महिन्यातील सर्वात कमी आहे. त्यामुळे प्रशासनाच्या दृष्टीने ही दिलासादायक बाब मानली जात आहे. तसेच आणखी चांगली बाब म्हणजे अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत देखील बरीच घट झाली आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासात १४,८४९ जणांना कोरोनाची लागण झाली असून, १५५ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील करोनाग्रस्तांचा आकडा हा १ कोटी ६ लाख ५४ हजार ५३३ एवढा झाला आहे. सध्या देशातील विविध भागात १ लाख ८४ हजार ४०८ रुग्णांवर उपचार सुरु असून, उपचारादरम्यान आतापर्यंत १ लाख ५३ हजार ३३९ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक म्हणजे आतापर्यंत १ कोटी ०३ लाख १६ हजार ७८६ जणांनी करोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. देशात करोना लसीकरणाला सुरुवात झाली असून, सध्या १ लाख ८४ हजार ४०८ जणांवर उपचार सुरु असून, आतापर्यंत १५ लाख ८२ हजार २०१ जणांना करोनाची लस देण्यात आली आहे.

महाराष्ट्रात स्थिती काय?

राज्यात मागील २४ तासात २ हजार ६९७ करोना बाधित रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता २० लाख ०६ हजार ३५४ एवढी झाली आहे. तर काल एका दिवसात ३ हजार ६९४ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण १९ लाख १० हजार ५२१ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण ४३ हजार ८७० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान, काल एका दिवसात ५६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यात एकूण ५० हजार ७४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.