दिल्ली | Delhi

भारत आणि चीन या दोन्ही राष्ट्रांमध्ये तणावाची परिस्थिती उद्भवलेली आहे. दरम्यान शुक्रवारी लडाखच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून (LAC) भारतीय लष्कराने चीनच्या एका सैनिकाला पकडले.

पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) त्या सैनिकाला पँगॉंग सरोवरच्या दक्षिण भागातून भारतीय लष्कराने ताब्यात घेतले होते. या सैनिकाला तातडीने सोडण्याची मागणी चीनकडून करण्यात आली आहे.

रात्रीच्या अंधारात आणि कठीण भौगोलिक परिस्थितीमुळे हा जवान भारत-चीन सीमेवर बेपत्ता झाला होता. त्यानंतर याची माहिती भारतीय लष्कारालाही देण्यात आली होती. जेणेकरून भारताकडून त्याला शोधण्यासाठी मदत होईल, असं चिनी लष्कराच्या एका ऑनलाईन साईटवर ही माहिती देण्यात आली आहे. दोन तासानंतर भारतीय लष्कराच्या बाजूने प्रतिसाद देण्यात आला. बेपत्ता असलेला सैनिक भारतीय लष्कराला मिळाल्याचं भारताकडून सांगण्यात आलं आहे. लवकरच हा सैनिक चीनकडे परत केला जाणार असल्याचं या साईटवरून चिनी लष्करानं म्हटलं होतं. दुसरीकडे, चिनी वेबसाइटने भारताला कराराची आठवण करून दिली आहे. 'भारताने दोन्ही देशांमध्ये झालेल्या संबंधित कराराचं काटेकोरपणे पालन केलं पाहिजे आणि बेपत्ता झालेल्या चिनी सैनिकाला वेळ न घालवता चीनला परत करावं, जेणेकरून दोन्ही देशांमधील सीमा तणाव कमी करण्यासाठी सकारात्मक पावलांची भर पडेल आणि दोन्ही देश संयुक्तपणे सीमेवर शांतता राखू शकील', असं चीनने म्हटलं आहे.

लडाखमध्ये भारत-चीन सीमेवर दोन्ही बाजूने हजारो सैनिक तैनात आहेत. सीमेवर तणावाची स्थिती आहे. अशा स्थितीत चिनी सैनिकाला अटक झाली आहे. यामुळे तणावात भर पडली आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर दोन्ही देशांमधील तणाव कायम आहे. दोन्ही देशांनी लडाखमध्ये सीमेवर मोठ्या प्रमाणावर सैनिक तैनात केले आहेत.