करोना संकट दूर झाल्यानंतर प्रलंबित खटले वाढणार

सरन्यायाधीशांनी व्यक्त केली शक्यता
करोना संकट दूर झाल्यानंतर प्रलंबित खटले वाढणार

नवी दिल्ली | New Delhi -

करोना महामारीच्या संकटात फक्त महत्त्वाच्या याचिकांवरच सुनावणी होेत आहेत. हे संकट दूर झाल्यानंतर देशभरातील न्यायालयांमध्ये प्रलंबित खटल्यांची संख्या प्रचंड प्रमाणात

वाढणार आहे, अशी शक्यता सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी आज शनिवारी व्यक्त केली. न्यायव्यवस्था, न्यायाधीश आणि न्यायप्रशासन यावरील एका पुस्तकाचे विमोचन करताना सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या माजी वरिष्ठ न्यायमूर्ती आर. बानुमती यांनी हे पुस्तक लिहिले आहे.

सरन्यायाधीश म्हणाले, आधीच न्यायालयांमध्ये लाखो खटले तुंबलेले आहेत. त्यात आता करोना काळात प्रलंबित राहिलेल्या नव्या खटल्यांची भर पडणार आहे. यातील बहुतांश खटले मध्यस्थींच्या माध्यमातून निकाली काढावे लागणार आहेत. कारण, इतक्या मोठ्या प्रमाणातील खटल्यांवर निकाल देणे न्यायाधीशांना शक्य होणार नाही. त्यांच्यावरील ताण वाढणार आहे, करोनाचा हा काळ संकटाचा आहेच, पण त्यानंतरचा काळ न्यायव्यवस्थेसाठी मोठ्या चिंतेचा असणार आहे.

या काळात न्यायाधीशांवर वेगळेच संकट असेल. त्यावर कोणताही उपाय मला सध्यातरी दिसत नाही. आम्हाला खटल्याचे प्राधान्य ठरवावे लागणार आहे. मात्र, खटल्यांची संख्या इतकी जास्त असेल की, यात देखील अनेक अडचणी येणार आहेत, न्यायाधीशांना करोनानंतरचा काळ खूप त्रासदायक ठरेल, असे मला म्हणायचे नाही, पण हे खटले इतके जास्त असतील की, ते निकाली काढताना तणाव हा येणारच आहे. त्यामुळे सहज सुटू शकणार्‍या खटल्यांमध्ये मध्यस्थांची मदत घ्यावी लागणार आहे, असेही ते म्हणाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com