तरुणाला भररस्त्यावर कानशिलात लगावणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांची गच्छंती!

तरुणाला भररस्त्यावर कानशिलात लगावणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांची गच्छंती!

दिल्ली | Delhi

देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरु आहे. करोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी लावलेल्या नियमांचं सर्रास उल्लंघन करताना नागरिक दिसतात. मग अशा वेळी पोलिसांकडून चोपही दिला जातो. दरम्यान, शनिवारी संध्याकाळपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत होता. या व्हिडिओमध्ये एक जिल्हाधिकारी भररस्त्यावर एका तरुणाला कानशिलात लगावताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये जिल्हाधिकारी एका तरुणाचा मोबाईल रस्त्यावर आदळून फोडताना दिसत आहेत. इतकंच नाही तर यानंतर त्यांनी तरुणाला चापटही मारली. एवढं करुनही समाधान न झाल्यानं त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यालाही या युवकाला मारण्यास सांगितलं. हा व्हिडिओ छत्तीसगडच्या सूरजपुर जिल्ह्यातील आहे. या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या जिल्हाधिकाऱ्याचं नाव रणवीर शर्मा असं आहे.

दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी जोर लागली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी शर्मा यांनी माफी मागितली. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनाही या प्रकरणी लक्ष घालण्याचे आवाहन नेटकऱ्यांनी केलं. याची दखल घेत मुख्यमंत्री बघेल यांनी जिल्हाधिकारी शर्मा यांची पदावरून हकालपट्टी करण्याचे आदेश दिले. देशातील आयएएस वर्तुळातूनही रणबीर शर्मा यांच्या या वर्तनावर नाराजी व्यक्त केली जात आहे.

छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय की, 'सुरजपूरचे जिल्हाधिकारी रणवीर शर्मा यांनी एका युवकाशी गैरव्यवहार केल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळाली. ही घटना अत्यंत दु:खद आणि निंदनीय आहे. छत्तीसगडमध्ये अशा प्रकारचे वर्तन कधीही सहन केलं जाणार नाही. जिल्हाधिकारी रणवीर शर्मा यांना तात्काळ निलंबित केलं जात आहे.' तसेच 'प्रशासनातील कोणत्याही अधिकाऱ्याकडून अशा प्रकारचे वर्तन स्वीकाहार्य नाही. या घटनेमुळे मला वेदना झाल्या आहेत. मारहाण झालेल्या त्या तरुण आणि कुटुंबाप्रती मी दिलगिरी व्यक्त करतो.' असेही त्यांनी म्हंटल आहे.

दरम्यान, छत्तीसगडमध्ये ३१ मे पर्यंत लॉकडाउन लागू करण्यात आलं आहे. लॉकडाउनच्या काळात फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com