पोलीस हेल्पलाईन क्रमांक ‘100’ होणार बंद ; ‘हा’ आहे नवा नंबर

देशपातळीवर एकच मदत संपर्क क्रमांक
पोलीस हेल्पलाईन क्रमांक ‘100’ होणार बंद ; ‘हा’ आहे नवा नंबर

मुंबई -

महाराष्ट्रात पोलिसांशी संपर्क साधण्याचा 100 हा क्रमांक लवकरच बंद होणार आहे. आपत्कालीन प्रसंगी पोलिसांना संपर्क करायचा असल्यास

100 हा नंबर चटकन नजरेसमोर येतो. अनेक वर्षांपासून हा नंबर पीडितांच्या सेवेत आहे. देशभरातील 20 राज्यांमध्ये 100 नंबर पोलिसांशी संपर्कासाठी वापरण्यात येतो. त्यात महाराष्ट्र व गुजरात या राज्यांचा देखील समावेश होतो. पण लवकरच 100 हा क्रमांक कायमचा इतिहासजमा होणार आहे. त्याऐवजी 112 हा नवीन व एकच क्रमांक आपत्कालीन प्रसंगी पीडितांच्या सर्व प्रकारच्या मदतीला उपलब्ध होणार आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत राज्यात 112 हा एकच क्रमांक सर्व प्रकारची मदत मिळण्यासाठी उपलब्ध होणार आहे.

आतापर्यंत राज्यात पोलीस 100, अग्निशामक दल 101 व महिला हेल्पलाईनसाठी 1090 हे क्रमांक वापरण्यात येत होते. परंतु, लवकरच हे क्रमांक कायमस्वरूपी बंद होणार आहे. त्याऐवजी 112 हा एकच क्रमांक उपलब्ध असणार आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत 112 हा हेल्पलाईन क्रमांक म्हणून राज्यात अस्तित्वात येणार आहे. देशातील 20 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांनी 112 हा हेल्पलाईन क्रमांक स्वीकारला असल्याची माहिती आहे. यामध्ये मागच्या वर्षी सर्वप्रथम उत्तर प्रदेश सरकारने 100 क्रमांकाऐवजी 112 नंबरचा वापर हेल्पलाईन म्हणून सुरु केला होता. त्यानंतर महाराष्ट्रात सुद्धा या क्रमांकांच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न सुरू आहे.

112 या एकाच क्रमांकाद्वारे सर्व प्रकारची मदत संकटात सापडलेल्या व्यक्तीला मिळावी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत राज्यामध्ये 112 हा हेल्पलाईन क्रमांक म्हणून अस्तित्वात आणला जावा यादृष्टीने तयारी सुरू आहे, अशी माहिती अप्पर पोलीस महासंचालक व नोडल ऑफिसर सेंट्लाईज हेल्पलाईन सिस्टीमचे एस जगन्नाथ यांनी दिली आहे.

आपत्कालीन प्रसंगी जर कुणी 112 क्रमांकावरून संपर्क साधल्यास तात्काळ आणि एकाच वेळी पोलीस नियंत्रण कक्ष, अग्निशामक दल, महिला हेल्पलाईन, चाईल्ड हेल्पलाईन यांना संबंधित क्रमांकाची माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. याबाबत लवकरच सविस्तर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. राज्यात अस्तित्वात असलेल्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातून या यंत्रणेसंदर्भात प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर देशपातळीवर एकच मदत संपर्क क्रमांक असावा या चर्चेने जोर धरला होता. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने देखील त्याप्रकारच्या सूचना दिल्या होत्या. त्याचाच आधार घेऊन आपत्कालीन प्रतिसाद सहाय्य प्रणाली निर्मितीचा निर्णय घेण्यात आला आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com