भाजपाची सत्ता नसलेल्या राज्यांवर केंद्राचा अन्याय

सोनिया गांधींची टीका
भाजपाची सत्ता नसलेल्या राज्यांवर केंद्राचा अन्याय

नवी दिल्ली -

भाजपाची सत्ता नसलेल्या राज्यांवर केंद्र सरकार अन्याय करत असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केला आहे. वाढत्या करोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसने वर्कींग कमिटीची बैठक बोलावली होती.

यावेळी सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली. केंद्राकडून भाजपा शासित राज्यांना प्राथमिकता दिली जात असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. तर करोना संदर्भातील उपाययोजनावरही त्यांनी आक्षेप घेतला.

सोनिया गांधी म्हणाल्या,

काँग्रेसशासित राज्यातील मुख्यमंत्री वारंवार करोनासंदर्भातील उपाययोजनासाठी केंद्राकडे मदत मागत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आवश्यक बाबींची पूर्तता करण्यास सांगत आहेत. मात्र केंद्र सरकार यावर कोणेतेही पाऊल उचलताना दिसत नाही. काही राज्यांमध्ये लसींचा तुटवडा आहे, व्हेंटिलेटर नाही, ऑक्सिजन संपलंय. या बाबी वारंवार सांगूनही भाजपाशासित राज्यांना प्राधान्य दिलं जात आहे.

दूसर्‍या देशांना मदत करण्याच्या नादात आपल्याच देशात लसींचा तुटवडा जाणवू लागला आहे. हजारो लोक रोज मरताहेत. मात्र सरकार मूग गिळून गप्प बसल्याची टीकाही सोनिया गांधी यांनी यावेळी केली. तर रेमडेसिवीर, ऑक्सिजन यासारख्या वस्तूंवर 12 टक्के जीएसटी का घेतला जात आहे?. तसेच करोनाविरुद्ध लढण्यासाठी आवश्यक वस्तू असलेल्या ऑक्सिमीटर आणि व्हेंटिलेटरवर 20 टक्के जीएसटी का? असा प्रश्‍नही सोनिया गांधी यांनी बैठकीत उपस्थित केला.

दरम्यान, करोना संबंधित आवश्यक वस्तुंना जीएससीटी करातून मुक्त ठेवण्याची प्रमुख मागणी या बैठकीत करण्यात आली. तसेच 25 वर्षांपेक्षा कमी वयोगटातील नागरिकांनाही लस देण्यात यावी, यावर बैठकीत एकमत झालं. त्याचबरोबर गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या प्रत्येक नागरिकाला लस देणं आवश्यक असल्याचं मतही मांडण्यात आलं. करोनामुळे गरीब नागरिकांची आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यांना केंद्र सरकारने आर्थिक मदत करण्याचे आवाहनही बैठकीत करण्यात आलं. लॉकडाऊन प्रभावित नागरिकांना 6-6 हजार रुपयांची आर्थिक मदत करावी त्याचबरोबर प्रवासी मजुरांसाठी योग्य उपाययोजना करण्यात यावी अशा मागण्या बैठकीत करण्यात आल्या.

करोना लसीकरणाची वयोमर्यादा 25 वर्ष करावी

सरकारने करोना प्रतिबंधक लसीकरणाच्या वयोमर्यादेवर फेरविचार केला पाहिजे आणि वयोमर्यादा 25 वर्षांपर्यंत कमी करावी. दमा, मधुमेह, मूत्रपिंड आणि यकृत आजारांनी ग्रस्त असलेल्या सर्व तरूणांना लस द्यावी, अशी मागणी सोनिया गांधी यांनी केली. देशात सध्या करोना लसीकरणासाठी किमान वयोमर्यादा 45 वर्षे आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com