लिलावाद्वारे रेल्वेस्थानकांचे खासगी हस्तांतरण

रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची माहिती
लिलावाद्वारे रेल्वेस्थानकांचे खासगी हस्तांतरण

नवी दिल्ली | New Delhi - भारतीय रेल्वेच्या 151 प्रवासी गाड्यांचे खासगीकरण करून त्यांना खासगी क्षेत्रातील कंपन्यांच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता केंद्र सरकार देशातील रेल्वेस्थानकांचे आधुनिकीकरण करून त्यांना खासगी क्षेत्राच्या ताब्यात देण्याचा सरकारचा विचार आहे. त्यासाठी लिलाव पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल Piyush Goyal यांनी याबाबत माहिती दिली.

मर्चंट चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (एमसीसीआय) Merchant Chamber of Commerce and Industry (MCCI) ने आयोजित केलेल्या वेबिनारला संबोधित करताना रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ही माहिती दिली. तसेच रेल्वेगाड्यांच्या खासगीकरणासाठी बोली लागल्या असून, त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे, असेही गोयल यांनी यावेळी सांगितले.

रेल्वेस्थानकांचे खासगीकरण करण्याबाबत गोयल म्हणाले, रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्याचा सरकारचा विचार आहे. त्यानंतर लिलाव पद्धतीने ही रेल्वे स्थानके खासगी क्षेत्रांकडे हस्तांतरीत केली जातील. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये माल गलियारा योजनेसाठी आवश्यक तेवढी जमीन पश्चिम बंगाल सरकारने या योजनेसाठी तयार करण्यात आलेल्या विशेष विभागाकडे हस्तांतरीत केलेली नाही, असेही गोयल यांनी सांगितले.

यावेळी कोलकातामधील मेट्रो वाहतुकीबाबत विचारले असता रेल्वेमंत्री म्हणाले, जर राज्य सरकारने परवानगी दिली तर कोलकात्यामध्ये मेट्रो सेवा सुरू होईल. मात्र मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ह्या विमान आणि उपनगरीय रेल्वेसेवा सध्या सुरू करण्याच्या विरोधात आहेत. जर मेट्रोची वाहतूक आताच सुरू केली तर करोनामुळे परिस्थिती बिघडू शकते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com