राजीव गांधी फाउंडेशनचा FCRA परवाना रद्द; केंद्र सरकारचा गांधी कुटुंबाला दणका?

राजीव गांधी फाउंडेशनचा FCRA परवाना रद्द; केंद्र सरकारचा गांधी कुटुंबाला दणका?

दिल्ली | Delhi

कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी राजीव गांधी फाउंडेशन (RGF) या गांधी कुटुंबाशी संबंधित एनजीओचा फॉरेन कॉन्ट्रिब्युशन रेग्युलेशन अॅक्ट (FCRA) परवाना केंद्र सरकारने रद्द केला आहे. २०२० मध्ये गृह मंत्रालयाने स्थापन केलेल्या आंतर-मंत्रालयीन समितीने केलेल्या चौकशीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जुलै २०२० मध्ये गृह मंत्रालयाने चौकशी समिती स्थापन केली होती. त्याच्या अहवालाच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. या तपास समितीमध्ये एमएचए, ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश होता. परवाना रद्द करण्याची नोटीस राजीव गांधी फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्याला पाठवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

जून २०२० मध्ये भाजपने फाउंडेशनवर परदेशी निधी कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. तत्कालीन कायदा मंत्री आणि भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी राजीव गांधी फाऊंडेशनला चीनने आर्थिक मदत केल्याचा दावा केला होता. सरकारच्या परवानगीशिवाय कोणताही पक्ष परदेशातून पैसा घेऊ शकत नाही, असा कायदा आहे. या देणगीसाठी सरकारकडून मंजुरी घेण्यात आली होती का, हे काँग्रेसने स्पष्ट करावे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता.

माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या RGF च्या अध्यक्षा आहेत तर इतर विश्वस्तांमध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, माजी अर्थमंत्री पी चिदंबरम, काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांचा समावेश आहे.१९९१ मध्ये स्थापन झालेल्या RGF ने १९९१ ते २००९ पर्यंत आरोग्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान, महिला आणि मुले, अपंगत्व समर्थन इत्यादींसह अनेक गंभीर समस्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्रातही काम केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com