80 कोटी नागरिकांना पुढचे दोन महिने मिळणार मोफत धान्य

केंद्राचा निर्णय
80 कोटी नागरिकांना पुढचे दोन महिने मिळणार मोफत धान्य

नवी दिल्ली -

वाढता करोना संसर्ग रोखण्यासाठी देशातील अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या अशा काळात गोर गरीब नागरिकांना उपाशी राहण्याची वेळ येऊ नये याकरता पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मोफत धान्य देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. येत्या मे आणि जून महिन्यात 5 किलो मोफत धान्य देण्यात येणार आहे. या योजनेचा 80 कोटी नागरिकांना फायदा होणार आहे. या निर्णयामुळे गरीब जनतेला दिलासा मिळणार आहे. या योजनेवर केंद्र सरकार 26 हजार कोटी रुपये खर्च करणार आहे.

करोनाच्या पहिल्या लाटेत कडक लॉकडाऊन पुकारण्यात आला होता. त्यावेळी सर्वच सेवा आणि सुविधा बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे अनेकांच्या रोजगारावर गदा आली होती. अशा काळात गोर गरिबांना उपाशी राहायला लागू नये म्हणून पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना राबवण्यात आली.

कालांतराने लॉकडाऊन हळूहळू शिथिल करण्यात आल्यानंतर ही योजना बंद करण्यात आली.नोव्हेंबर 2020 पासून केंद्र शासनाने पंतप्रधान गरीब कल्याण योजना बंद केली होती. मात्र, कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत आता पुन्हा अनेक राज्यांत लॉकडाऊन पुकारण्यात आल्याने केंद्र सरकारने ही योजना पुन्हा राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, केंद्र सरकारने दोन महिने मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com