जम्मू-काश्मीर बनणार हायटेक

‘नया श्रीनगर आणि नया जम्मू’ प्रकल्प
जम्मू-काश्मीर बनणार हायटेक

नवी दिल्ली | New Delhi -

जम्मू-काश्मीरातील कलम 370 गेल्यावर्षी 5 ऑगस्टला रद्द केल्यानंतर आता केंद्र सरकार जम्मू-काश्मीर हायटेक बनवणार आहे. जम्मू काश्मीर शासन आणि केंद्रीय नगर विकास मंत्रालय यांनी याबाबतचा आराखडा बनविला असून त्याला अंतिम रूप देण्याचे काम सुरू आहे. Jammu & Kashmir

जम्मू व काश्मीर राज्याचा विशेष दर्जा काढून घेतल्याला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या राज्याचा सर्वंकष विकास करण्याची ग्वाही केंद्र सरकारने दिली होती. या पार्श्‍वभूमीवर नया श्रीनगर आणि नया जम्मू या उच्च तंत्रज्ञानयुक्त आणि पर्यावरणपूरक शहरांसह महत्त्वाच्या प्रकल्पांची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करण्याची शक्यता आहे.

या प्रकल्पांच्या अंतिम आराखड्यावर केंद्रीय नगरविकास मंत्रालय आणि जम्मू- काश्मीर प्रशासन हे संयुक्तपणे काम करत असून, पंतप्रधान वैयक्तिक रीत्या त्यावर देखरेख करीत आहेत. एक आठवड्यापूर्वीच केंद्र सरकारने माजी केंद्रीय मंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते मनोज सिन्हा यांची जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल म्हणून नेमणूक केली आहे.

नव्या आराखड्यानुसार, खोर्‍यासाठी आखण्यात आलेल्या योजनेत दल सरोवराचे जुने वैभव पुनर्स्थापित करण्याच्या प्रकल्पाचा समावेश आहे. या सरोवराभोवती दाट वस्ती असल्याने गेल्या काही वर्षांत त्याचे सौंदर्य कमी झाले आहे. याशिवाय, त्याभोवती अतिक्रमणे आहेत. त्यामुळे सरोवराभोवतालच्या भागातील भार कमी करण्याचा योजनेत समावेश असेल.

श्रीनगरची संस्कृती, शिल्पकला आणि सौंदर्यदृष्टी यांच्याबाबत संवेदनशीलता बाळगून नव्या शहराची उभारणी व्हावी याबाबत पंतप्रधान आग्रही आहेत. मात्र याचवेळी, हे टिकाऊ असे हायटेक शहर असेल.

दल सरोवर 40 टक्के आक्रसले असून पाण्याचा दर्जाही खालावला आहे, असे ड्रेनेज कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला आढळल्यानंतर जम्मू-काश्मीर प्रशासनाने दल सरोवराला पर्यावरण-संवेदनशील क्षेत्र जाहीर करण्यासाठी गेल्यावर्षी एक समिती नेमली होती. या समितीने फेब्रुवारीत अहवाल सादर केला आहे. पंतप्रधान मोदी जम्मू शहरासाठीही नव्या प्रकल्पाची घोषणा करण्याची शक्यता आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com