सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य - पंतप्रधान
सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द
संग्रहित

नवी दिल्ली - सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात मंगळवारी घेतलेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. करोना संकटामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा देखील करोनाच्या पार्श्‍वभूमीवर रद्द करण्याची मागणी केली जात होती. करोनाच्या दुसर्‍या लाटेच्या काळामध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आणि सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो, अशी भिती देखील वर्तवली जात होती. या पार्श्‍वभूमीवर अखेर पंतप्रधानांनी घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, परीक्षा होणार नसल्यामुळे आता 12वीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचा प्रश्‍न निर्माण होणार असून त्यासंदर्भात सीबीएसई निश्‍चित अशा मानकांच्या आधारे नियोजित वेळ ठरवून त्यानुसार मूल्यमापन करून निकाल जाहीर करेल, असं देखील स्पष्ट करण्यात आलं आहे. यासोबतच, गेल्या वर्षीप्रमाणेच याहीवर्षी ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची असेल, त्यांना जेव्हा परिस्थिती सामान्य होईल, तेव्हा परीक्षा देण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला जाईल, असं देखील सांगण्यात आलं आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य - पंतप्रधान

दरम्यान, हा निर्णय घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य असल्याचं स्पष्ट केलं आहे. सीबीएसई च्या 12वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीकोनातून घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि त्यांची सुरक्षा याला सर्वाधिक प्राधान्य असेल. त्याविषयी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये परीक्षेसंदर्भात निर्माण झालेला तणाव संपुष्टात यायला हवा. अशा प्रकारच्या तणावपूर्ण वातावरणात विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची सक्ती केली जाऊ नये. सर्व संबंधितांनी या गोष्टीकडे विद्यार्थ्यांसाठी संवेदनशीलतेने पाहायला हवे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com