सीबीएसई : बारावीच्या परीक्षेबाबत लवकरच निर्णय

केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांची माहिती
सीबीएसई : बारावीच्या परीक्षेबाबत लवकरच निर्णय

नवी दिल्ली - सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षेबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली आहे.

देशातील करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षा घ्यायच्या की नाही? याबाबत निर्णय घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी आज रविवारी (23 मे) सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या शिक्षण मंत्री तसेच सचिवांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. तर, विविध राज्यांच्या शिक्षण मंत्र्यांचा यामध्ये सहभाग होता. पोखरियाल यांनी विद्यार्थी, पालक, शिक्षक व इतरांकडून समाजमाध्यमातून त्यांचे म्हणणे मागवले होते.

मंत्री पोखरियाल यांनी ट्विट करुन बैठकीबाबत माहिती दिली आहे. याबाबत रमेश पोखरियाल यांनी सांगितले, बारावीच्या बोर्ड परीक्षांबाबत अन्य राज्यांसोबतची बैठक फलदायी ठरली. कारण, आम्हाला अत्यंत महत्वपूर्ण सल्ले मिळाले. मी राज्य सरकारांना 25 मे पर्यंत आपल्या विस्तृत सूचना पाठवण्यास सांगितले आहे. यामुळे आम्ही इयत्ता बारावीच्या बोर्ड परीक्षेसंदर्भात एका निर्णयापर्यंत पोहचण्यात सक्षम होवू आणि विद्यार्थी व पालकांमधील संभ्रम दूर करण्यासाठी त्यांना आपल्या निर्णयाबाबत लवकरच सूचित करू. विद्यार्थी व शिक्षक दोघांचीही सुरक्षा आमच्यासाठी अतिशय महत्वाची आहे.

दरम्यान, एका वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार केंद्राकडून राज्यांसमोर परीक्षेसंबधी दोन पर्याय ठेवण्यात आले व ही परीक्षा रद्द न करण्याचा निर्णय झाला असून, जुलै महिन्यात ही परीक्षा होण्याची शक्यता आहे.

केवळ महत्वाच्या विषयांची परीक्षा घेणे किंवा परीक्षा पद्धत बदलणे हे ते दोन पर्याय असल्याची माहिती समोर आली आहे. याचबरोबर राज्यांच्या बोर्डांना आपला निर्णय घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. या बैठकीचा अहवाल पंतप्रधान कार्यालाकडे पाठवला जाईल. त्यानंतर 30 मे रोजी पुन्हा एकदा राज्यांच्या शिक्षण मंत्र्यांसोबत बैठक होण्याची शक्यता असून, त्यानंतर केंद्र सरकार परीक्षेबाबत आपला निर्णय जाहीर करेल.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com