
नवी दिल्ली | New Delhi
बिहारमध्ये (Bihar) नुकतीच नितीशकुमार (Nitish Kumar) सरकारने देशात पहिल्यांदा जातनिहाय जनगणना (Caste Wise Census) केली. त्यानंतर याची आकडेवारी गांधी जयंतीचे औचित्य साधत २ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आली. या आकडेवारीनुसार बिहारमध्ये हिंदूंची संख्या ८१.९९ टक्के आहे. तर मुस्लिमांची संख्या १७.७ टक्के, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन धर्मियांची लोकसंख्या १ टक्क्याहून कमी आहे. तसेच २,१४६ लोक निधर्मी असल्याचे या आकडेवारीतून समोर आले आहे.
बिहारनंतर आता काँग्रेसशासित (Congress ) कर्नाटक, राजस्थान, हिमाचल प्रदेश आणि छत्तीसगड या चार राज्यांमध्ये जातनिहाय जनगणना करण्यात येईल, अशी माहिती काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (MP Rahul Gandhi) यांनी दिली आहे. बिहारच्या धर्तीवर ही जातनिहाय जनगणना केली जाणार आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात देखील जातनिहाय जनगणना करण्यात यावी अशी मागणी सध्याच्या महायुती सरकारमधील अजित पवार गटाने केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना होणार का? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
दरम्यान, नुकतीच सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) बिहारच्या जनगणनेची आकडेवारी जाहीर करण्यावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका (Petition) फेटाळली होती. त्यानंतर काँग्रेसने आपले सरकार असलेल्या राज्यांमध्ये जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा आज झालेल्या काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीनंतर केली आहे.