
नवी दिल्ली | New Delhi
जर सामान्य व्यक्तीला बँकेचे लोन चुकवता आले नाही, तर संबंधित संस्थांकडून अशा व्यक्तींना धमकावण्यात आल्याचे प्रकारही निदर्शनास आले आहेत. जर आपणही लोन रिकव्हरी एजन्ट्सच्या (Loan Recovery Agents) त्रासाला सामोरे जात असाल, तर आपल्यासाठी दिलासादायक बातमी आहे.
रिझर्व्ह बँकेची (Reserve Bank of India) थकीत कर्जाच्या वसुलीबाबत ग्राहकांना केल्या जाणाऱ्या फोनसाठी नवी नियमावली जारी केली आहे. वसुली एजंट कर्जधारकांना सकाळी आठपूर्वी आणि सायंकाळी सातनंतर फोन करू शकणार नाही. धमकीही देऊ शकणार नाही.
आरबीआयने गुरुवारी थकित कर्जाच्या वसुलीसाठी नियम कडक करण्यासंदर्भात प्रस्ताव दिला. यानुसार, वित्तीय संस्था आणि त्यांचे वसुली एजन्ट्स कर्जदारांना सकाळी ८ वाजण्यापूर्वी आणि सायंकाळी ७ नंतर कॉल करू शकणार नाही.
RBI च्या 'जोखीम व्यवस्थापन आणि आचारसंहितेवरील मसुदा सूचना' मध्ये नमूद करण्यात आल्यानुसार, बँका आणि NBFC सारख्या नियमन केलेल्या संस्थांनी प्रमुख व्यवस्थापनाची कार्य आउटसोर्स करू नयेत. या कामांमध्ये पॉलिसी तयार करणे आणि KYC नियमांचे पालन करणे आणि कर्ज मंजूर करणे यांचा समावेश होतो.
मसुद्यानुसार, बँका आणि एनबीएफसीने डायरेक्ट सेल्स एजन्ट्स (DSA), डायरेक्ट मार्केटिंग एजन्ट्स (DMA) आणि वसूली एजन्ट्ससाठी कोड ऑफ कंडक्ट अर्थात आचारसंहिता तयार करायला हवी. याच बरोबर, रेग्युलेटेड एंटिटीजने डीएसए, डीएमए आणि वसूली एजन्ट्सना योग्य पद्धतीने प्रशिक्षित करायला हवे. मध्यवर्ती बँकेनं असं म्हटलं आहे की, RE आणि त्यांचे वसुली एजंट कर्जाची वसुली करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीसोबत शाब्दिक किंवा शारीरिक, तसेच, कोणत्याही प्रकारची धमकी किंवा छळ करणार नाहीत. यासह, वसुली एजंट कर्जदारांचा सार्वजनिकपणे अपमान करू शकत नाहीत किंवा त्यांच्या गोपनीयतेमध्ये हस्तक्षेप करू शकत नाहीत.