Budget Session 2021: जाणून घ्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणातील महत्वाचे मुद्दे

आजपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली.
Budget Session 2021: जाणून घ्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणातील महत्वाचे मुद्दे

दिल्ली l Delhi

आजपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. अधिवेशनाच्या सुरुवातीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित केलं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा उल्लेख केला. केंद्र सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयाचं कौतूक करतानाच राष्ट्रपतींनी कृषी कायदे फायद्याचे असल्याचं सांगितलं. त्याचबरोबर प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वजाच्या अपमानाची घटना दुर्दैवी असल्याचं सांगत नाराजी व्यक्त केली.

राष्ट्रपतींनी अभिभाषणात करोना आणि इतर संकटांचा सामना करताना केंद्र सरकारनं घेतलेल्या निर्णयाचं कौतूक केलं. सरकारनं योग्यवेळी घेतलेल्या निर्णयांमुळे लाखो भारतीयांचे प्राण वाचल्याचं सांगत राष्ट्रपतींनी सरकारला शाबासकी दिली.

तसेच राष्ट्रपतींनी तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरही भाष्य केलं. “सखोल चर्चेनंतर संसदेत सात महिन्यांपूर्वी तीन कृषी कायदे करण्यात आले. या कृषी सुधारणांचा फायदा १० कोटी पेक्षा जास्त छोट्या शेतकऱ्यांना तात्काळ मिळणं सुरू झालं आहे. छोट्या शेतकऱ्यांना होणारा फायदा लक्षात घेऊन अनेक राजकीय पक्षांनी वेळोवेळी या सुधारणांना पाठिंबा दिला होता,” असं राष्ट्रपती म्हणाले.

“सध्या या कायद्यांना सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. सरकार सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचा सन्मान करून त्याचं पालन करेल. कृषी कायद्यांबद्दल शेतकऱ्यांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. सरकार प्रत्येक आंदोलनाच आदर करते. मात्र, काही दिवसांपूर्वी प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वजाचा अपमान झाल्याची घटना दुर्दैवी आहे. जे संविधान आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य देते. तेच संविधान आपल्याला कायदा आणि नियमांचं गंभीरपणे पालन केलं पाहिजे,” असं राष्ट्रपती म्हणाले.

पुढे बोलतांना राष्ट्रपती म्हणाले की, आत्मनिर्भर भारत मोहीम केवळ भारतात निर्मिती करण्याची नाही तर भारतातील लोकांना बळकटी देण्याची संधी आहे. यामुळे भारतीय शेती मजबूत होईल. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करून MSP मध्ये दीडपट वाढ करण्यात आली आहे. माझे सरकार MSP वर विक्रमी खरेदी करत आहे आणि खरेदी केंद्रेही वाढवत आहेत. जुन्या सिंचन प्रकल्पांसह आधुनिक सिंचन तंत्रज्ञानही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहे. सूक्ष्म सिंचनाद्वारे शेतकरी जोडले जात आहेत.

तसेच, कितीही मोठे आव्हान असो. ना आम्ही थांबणार ना भारत थांबणार. एकता आणि बापूंच्या प्रेरणेने आपल्याला शेकडो वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्तता दिली होती. भारताची महानता हे अंतिम सत्य आहे. सर्व जण एक व्हा. आज भारतीयांच्या या एकतेने आपल्याला बर्‍याच समस्यांमधून बाहेर आणले आहे. करोना, भूकंप, पूर, सीमेववरील अप्रत्यक्ष तणाव झाला. आपण सर्वांनी एकत्रित येऊन या समस्यांचा सामना केला. असे राष्ट्र्रपतींनी म्हंटले आहे.

पुढे बोलतांना राष्ट्रपती म्हणाले की, सरकारनं गरीब महिलांच्या जन धन खात्यात जवळपास ३१ हजार कोटी रुपये थेट हस्तांतरित केले. देशभरातील उज्ज्वला योजनेतील गरीब महिला लाभार्थ्यांना १४ कोटींहून अधिक मोफत गॅस सिलिंडर प्राप्त झाले. करोना काळात निर्माण झालेल्या जागतिक परिस्थितीत जेव्हा प्रत्येक देशाची प्राथमिकता 'देशातील गरजा' होत्या, तेव्हा आत्मनिर्भर भारताचं निर्माण इतकं महत्त्वाचं का आहे, याची आपल्याला आठवण करून दिली असेही राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हंटले आहे.

तसेच, आपल्यासाठी ही अभिमानाची बाब आहे की आज भारत जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबवत आहे. या मोहिमेसाठी वापरल्या जाणाऱ्या दोन्ही लसी भारतात तयार करण्यात आलेल्या आहेत. या संकटाच्या काळात भारतानं मानवतेचं कर्तव्य बजावत अनेक देशांना करोना लसींचे लाखो डोस उपलब्ध करून दिले असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हंटले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com