भारत बंदला देशभरातून संमिश्र प्रतिसाद

सरकारसोबत चर्चेची उद्या सहावी फेरी
भारत बंदला देशभरातून संमिश्र प्रतिसाद

नवी दिल्ली -

नवे कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी दिल्लीच्या विविध सीमांजवळील भागात गेल्या तेरा दिवसांपासून आंदोलन करणार्‍या हजारो शेतकर्‍यांनी

मंगळवारी (8 डिसेंबर) भारतबंदची हाक दिली होती. भारत बंदला देशभरातून संमिश्र प्रतिसाद मिळाला. 20 पेक्षा जास्त पक्षांनी या आंदोलनास पाठिंबा दिला होता. अनके राज्यात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. दरम्यान सरकारसोबत चर्चेची सहावी फेरी उद्या होणार आहे.

मुख्यत: पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेशच्या शेतकर्‍यांनी चक्का जाम करत महत्त्वाचे रस्ते सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळात बंद केले. दुकाने आणि बाजारपेठाही बंद केल्या. अनेक राज्यात वाहतूक व्यवस्थाही कोलमडली होती. भारत बंदचा सर्वात जास्त परिणाम पंजाब, हरयाणा आणि दिल्ली राज्यात झाला. पश्चिम बंगाल, बिहार आणि ओडिशा राज्यात अनेक ठिकाणी आंदोलकांनी रेल्वे अडवल्या होत्या. दिल्लीच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात शेतकरी जमले असून पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.

राजकीय संघटना, व्यापारी संघटनांसह इतर अनेक संघटनांनी भारत बंदमध्ये सहभाग घेतला. शेतकर्‍यांनी भारत बंदद्वारे एकतेचं दर्शन घडवलं. कृषी कायदे रद्द करण्याची गरज यातून अधोरेखित होते असे सांगत पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी शांततापूर्ण मार्गाने भारत बंद आंदोलन केल्याबद्दल शेतकर्‍यांचे आभार मानले.

अत्यावश्यक सेवा राहिल्या सुरू - केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज 13वा दिवस आहे. आतापर्यंत शेतकरी संघटना आणि केंद्र सरकारमध्ये झालेल्या चर्चांच्या फेरींमधून कोणताही तोडगा समोर आलेला नाही. यापुढील चर्चेची फेरी 9 डिसेंबरला पार पडणार आहे. त्यापूर्वी आज भारत बंद ठेवण्याचे आवाहन शेतकरी संघटनांनी केले आहे. या भारत बंद दरम्यान आपत्कालीन सेवांवर कोणताही परिणाम होणार नाही याबाबत आपण विशेष काळजी घेणार असल्याचे शेतकरी संघटनांनी रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com