
नवी दिल्ली | New Delhi
संसदेचे विशेष अधिवेशन (Special Session Of Parliament) सुरू व्हायला अजून पाच दिवस बाकी आहेत, मात्र त्याआधीच मोठी माहिती समोर आली आहे. संसदेचे विशेष अधिवेशन सुरू होण्याच्या एक दिवस अगोदर विश्वकर्मा पूजेच्या निमित्ताने १७ सप्टेंबरला नवीन संसद भवनावर औपचारिकपणे तिरंगा फडकवण्याची योजना (Tiranga Hoisting) असल्याचे सांगण्यात येत आहे.
केंद्रीय लोक निर्माण विभागाने नवी इमारत बांधली आहे. नव्या संसदेत तीन प्रवेशद्वार असून या तीन प्रवेशद्वारापैकी एक मुख्य प्रवेशद्वार असणाऱ्या गजद्वारासमोर ध्वजारोहण सोहळा पार पडणार आहे. उद्घाटानंतर पार पडणारा हा पहिलाच सोहळा असणार आहे. याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही वाढदिवस आहे. याबाबत इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिले आहे.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, १८ ते २२ सप्टेंबरपर्यंत चालणारे विशेष अधिवेशन जुन्या इमारतीत सुरू होणार आहे. त्यानंतर संसद भवनाचे पुढील कामकाज नवीन संसदेत होईल. २८ मे रोजी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या नव्या संसदेत होणारे हे पहिले अधिवेशन असेल.
या विशेष अधिवेशनाबाबत अनेक घडामोडी घडत आहेत. संसदेच्या दोन्ही सभागृहात नवा ड्रेस कोडही लागू केला जाणार आहे. लोकसभेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या आत आणि बाहेरील कर्मचाऱ्यांना नवीन गणवेश असणार आहे.
मोदींच्या वाढदिवसाची जय्यत तयारी
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून जोरदार तयारी केली जात असून लोकसभा विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यंदा मुंबईत नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्याचे नियोजन भाजपने सुरु केले आहे.
दरम्यान, मुंबईत जनसामान्यांपर्यंत पोहचण्यासाठी १५ दिवस कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबीर, आयुष्यमान भारत कार्डचे वाटप, स्वच्छता मोहीमांचा धडाका असणार आहे. तसेच खासदारांपासून आमदार, नगरसेवक, जिल्हा अध्यक्ष, मंडल अध्यक्षांना कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.