दिल्ली । Delhi

करोना व्हायरस (Coronavirus) रोखण्यासाठी सध्या भारतासह जगभर प्रयत्न सुरू आहेत. तसेच जगभरात करोनाच्या लसीवर युद्ध पातळीवर काम सुरू आहे. देशात ‘सीरम’ संस्थेने उत्पादित केलेली ‘कोव्हिशिल्ड’ आणि भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ या दोन्ही

करोना लशींच्या मर्यादित आपत्कालीन वापरास भारताच्या औषध महानियंत्रकांनी रविवारी परवानगी दिली आहे. परंतु, योगगुरु बाबा रामदेव यांनी आता लसीकरणाबाबत एक विधान केले आहे. मी करोनाची लस घेणार नाही. मला त्याची गरज नाही, असे असे बाबा रामदेव यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलतांना म्हंटले आहे.

लसीविषयी बाबा रामदेव यांनी म्हंटले आहे की, मी वृत्तवाहिनीवर खुलेआम जाहीर करतो की, मी लसीचा वापर करणार नाही कारण मला याची गरज नाही. मला कोरोना देखील होणार नाही. मी अनेक लोकांना भेटतो आणि काही प्रमाणात खबरदारीही घेतो. करोनाचे किती अवतार येऊ देत मला काही होणार नाही. कारण आमचा योगावतार जिंदाबाद आहे, असं बाबा रामदेव यांनी सांगितले. तसेच करोनाशी घाबरुन राहण्याची गरज नाही. ज्यांना अनेक प्रकारचे आजार आहेत आणि ते योगही करतात. याशिवाय ज्यांना गरज आहे त्यांनी करोनाची लस जरुर घ्यावी. मी याच्या बाजूनेही नाही आणि विरोधातही नाही, असे बाबा रामदेव यांनी यावेळी सांगितले.

'करोना प्रतिबंधक लसीमध्ये गायीची किंवा डुक्कराचीही चरबी नाही. हा हिंदू किंवा मुसलमानांचा विषय नाही. हा शुद्ध स्वरुपात वैज्ञानिक संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे याला कोणत्याही धर्माशी जोडता कामा नये, असे बाबा रामदेव यांनी सांगितले.

आपल्या जीवनशैलीत योगाचा समावेश करण्याचा सल्लाही बाबा रामदेव यांनी लोकांना दिला आहे. बाबा रामदेव म्हणाले, '१३५ कोटी लोकसंख्या असलेल्या या देशात २०२१ मध्ये सामान्य लोकांना लस मिळेल याची शाश्वती नाही. अशा परिस्थितीत योग, आयुर्वेद आणि जीवनशैलीतील बदलांपासून लोकांचे प्राण वाचतील', असे बाबा रामदेव यांनी म्हटले आहे.