‘एनसीसी’ विस्ताराला मंजुरी

प्रस्तावावर राजनाथ सिंह यांचे शिक्कामोर्तब
‘एनसीसी’ विस्ताराला मंजुरी

नवी दिल्ली | New Delhi -

नॅशनल कॅडेट कोअरच्या (एनसीसी) 173 सीमा आणि तटवर्ती जिल्ह्यांतील विस्ताराला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंजुरी दिली असल्याचे संरक्षण मंत्रालयाने रविवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. National Cadet Corps

स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणात एनसीसीच्या विस्ताराची घोषणा केली होती. सीमा आणि तटवर्ती जिल्ह्यांत एनसीसीचा विस्तार केला जाईल. यामुळे नैसर्गिक आपत्तीतील व्यवस्थापनासाठी कुशल मनुष्यबळ उपलब्ध होईल आणि सशस्त्र दलांमध्ये कारकीर्द घडवण्यासाठी युवकांना या माध्यमातून कौशल्य प्रशिक्षण प्राप्त होईल, असे त्यांनी भाषणात सांगितले होते.

विस्तारीकरणाच्या मोठ्या योजनेचा एनसीसीने पाठवलेला प्रस्ताव मंजूर करण्यात आला, असे संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रात म्हटले आहे. सीमावर्ती आणि तटवर्ती जिल्ह्यांतील एक हजार शाळांची ओळख पटवण्यात आली असून, तिथे एनसीसी सुरू केली जाईल, असे या निवेदनात म्हटले आहे.

एक तृतीयांश मुलींचा सहभाग - 173 सीमावर्ती आणि तटवर्ती जिल्ह्यांतील एक लाख विद्यार्थ्यांना एनसीसीत सामावून घेतले जाईल. या एकूण संख्येपैकी एक तृतीयांश मुली असतील. विस्तारीकरण योजनेनुसार एनसीसीच्या एकूण 83 केंद्रांचे आधुनिकीकरण केले जाईल. यामध्ये लष्कराचे 53, नौदलाचे 20 आणि वायुदलाचे 10 विभाग असतील. याअंतर्गत सीमा व तटवर्ती भागातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाईल. सीमावर्ती भागातील एनसीसी केंद्रांना प्रशासकीय आणि प्रशिक्षणासाठी लष्कराकडून सहकार्य केले जाईल, असे या निवेदनात म्हटले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com