नवी दिल्ली -

नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकर्यांना एक पर्यायी व्यवस्था उपलब्ध झाली आहे. या कायद्यांमुळे शेतकर्यांचे आधीचे कोणते हक्क आणि

अधिकार हिरावले गेले, हे शेतकर्यांनी सांगावं असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. शेतकर्यांच्या व्यापक कल्याणासाठी जे काही करणे आवश्यक असेल, ते सरकार यापुढेही करेल. आवश्यकता भासल्यास कायद्यांमध्ये बदलही केले जाईल, असा निर्वाळाही त्यांनी दिला.

पर्याय असताना विरोध का सुरु आहे. जिथे जास्त फायदा तिथे शेतकरी आपला माल विकू शकतात. या कायद्यात कोणतंही बंधन नसून पर्याय आहेत. जर कायदा लादला असेल तर विरोध करु शकतो, असेही मोदींनी सांगितलं.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर लोकसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना मोदी म्हणाले, नवे कृषी कायदे शेतकर्यांना बंधनात टाकण्यासाठी नाही, तर बंधनातून मुक्त करण्यासाठी आहेत. प्रगतीसाठी काही कायदे आवश्यक असतात, त्यामुळे कृषी क्षेत्राच्या विकासााठी हे कायदे आणले आहेत. कोणत्याही बदलाला सुरुवातीला विरोध होत असतो, त्याप्रमाणे या कायद्यांनाही विरोध होत आहे. कृषी मंत्री या मुद्यावर शेतकर्यांशी सातत्याने चर्चा करीत आहे. या कायद्यांत काही बदल करण्याची आवश्यकता असेल, तर सरकार निश्चितपणे तसा बदल करेल.

गेल्या अनेक वर्षांपासून कृषी क्षेत्राला आव्हानांचा मुकाबला करावा लागत आहे. यातून कृषी क्षेत्राला बाहेर काढण्याची गरज होती. त्यामुळे कृषी क्षेत्रासाठी आम्ही करोनाकाळात तीन कायदे केले. कृषी क्षेत्रात सुधारणा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही केला आहे, सुधारणा करण्याची प्रक्रिया सातत्याने चालणारी आणि महत्त्वपूर्ण आहे. कृषी कायद्याच्या मुद्यावर शेतकर्यांची दिशाभूल केली जात आहे. या कायद्याने शेतकर्यांचे कोणते हक्क आणि अधिकार हिरावले जातात, हे कोणी सांगायला तयार नाही. शेतकर्यांच्या आंदोलनाला वेगळे वळण देण्याचा आंदोलनजीवींचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे. हे लोक आंदोलनाचा वापर आपल्या फायद्यासाठी करीत आहे.

शेतकर्यांविषयी आदर

शेतकर्यांनी चर्चेसाठी समोर यावे. समस्या खूप असतील, तर त्यावरचे समाधानही तेवढ्याच प्रमाणात आहे. शेतकरी आंदोलन अतिशय पवित्र आहे, आंदोलनकर्त्या शेतकर्यांबद्दल माझ्या मनात अतिशय आदर आहे. मात्र, आंदोलनकर्ते आणि आंदोलनजीवी यातील फरक आम्हाला समजून घ्यावा लागेल. शेतकरी आंदोलनाच्या आडून आंदोलनजीवी टोल नाक्यावर हल्ला चढवत आहेत, दूरसंचार विभागाचे टॉवर तोडत आहे, हे कोणत्या प्रकारचे आंदोलन आहे.

काँगे्रस सदस्यांची घोषणाबाजी, सभात्याग

पंतप्रधानांच्या भाषणात अडथळा आणण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला. काळे कायदे मागे घ्या, अशा घोषणा काँग्रेसच्या सदस्यांनी दिल्या. यावर जोरदार हल्ला चढवताना मोदी म्हणाले की, काँग्रेस हा गोंधळलेला आणि एकमत नसलेला पक्ष आहे. त्यामुळे हा पक्ष राज्यसभेत एक भूमिका घेतो, तर लोकसभेत दुसरी. शेवटी काँग्रेसच्या सदस्यांनी सभात्याग केला.