दिल्ली l Delhi

देशात आज (२६ फेब्रुवारी) भारत बंदची हाक देण्यात आली आहे. देशातील...

परिवहन व कामगार संघटनांनी आज भारत बंद (Bharat Bandh) पुकारला आहे. वस्तू व सेवा कर (जीएसटी) प्रणाली, इंधन दरवाढ, ई-बिल या पार्श्वभूमीवर आज देशभरातील सर्व व्यापारी बाजार बंद ठेवण्यात येणार असल्याचे व्यापारी संघटना कॅटने (CAIT) म्हटले आहे. या भारत बंदमध्ये सुमारे ८ कोटी छोटे व्यवसायिक सहभागी होतील. तसेच देशातील जवळपास १ कोटी वाहतूकदार आणि लघु उद्योग आणि महिला उद्योजकही यात सहभागी होणार असल्याचा दावा केला जात आहे.

काय राहणार सुरू, काय बंद?

भारत बंदमध्ये ४०,००० हून अधिक व्यापारी संघटना सहभागी झाल्यामुळे देशभरातील व्यापारी बाजारपेठा बंद राहतील. तरीही संबंधित संस्थांनी घेतलेल्या निर्णयांवर हे अवलंबून आहे.

देशभरातील रस्ते वाहतूकीवर याचा परिणाम होऊ शकतो. एआयटीडब्ल्यूएने सर्व परिवहन कंपन्यांना सकाळी 6 ते 8 या दरम्यान वाहने पार्क करण्यास सांगितले आहे.

कोणत्याही प्रकारच्या वस्तूंचे बुकिंग, वितरण, लोडिंग/अनलोडिंग होणार नाही.

चार्टर्ड अकाऊंट्स आणि टॅक्स अॅडव्होकेट्सच्या संघटनांनीही संपाला पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे त्यांच्या सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

सीएआयटीचे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांच्यानुसार महिला उद्योजक, लघुउद्योग, फेरीवाले आणि इतर लोक देखील बंदमध्ये सामील होतील.

निषेध नोंदविण्यासाठी कोणताही व्यापारी जीएसटी पोर्टलवर लॉग इन करणार नाही.

अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय दुकाने, दूध, भाजीपाला दुकाने इत्यादींवर भारत बंदचा परिणाम होणार नाही. तसंच बॅँक सेवांवर परिणाम न होण्याची शक्यता आहे.

कोणत्या संघटना भारत बंदमध्ये सहभागी?

देशातील वाहतूक क्षेत्रातील सर्वात मोठी संघटना ऑल इंडिया ट्रान्सपोर्टर्स वेलफेअर असोसिएशनने यापूर्वीच कॅटच्या व्यापाराला पाठिंबा दर्शवला आहे. तसंच देशभरात चक्का जामचा इशारा दिला आहे. याशिवाय अनेक राष्ट्रीय व्यापारी संघटनांनी व्यापाऱ्यांच्या या बंदला पाठिंबा दर्शवला आहे. विशेषत: ऑल इंडिया एफएमसीजी डिस्ट्रिब्यूटर्स फेडरेशन, फेडरेशन ऑफ अॅल्युमिनियम युटेन्सिलस मॅन्यूफॅक्चरर्स अँड ट्रेडर्स असोसिएशन, नॉर्थ इंडिया स्पाइसिस ट्रेडर्स असोसिएशन, अखिल भारतीय महिला उद्योजक संघटना, अखिल भारतीय संगणक डीलर असोसिएशन, ऑल इंडिया कॉस्मेटिक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने या बंदला पाठिंबा दिला आहे.