कृषी कायद्यांविरोधात पंजाबमध्ये निदर्शने सुरूच, रेल्वेला १२०० कोटी रुपयांचे नुकसान

रेल्वे मंत्रालयाने दिली माहिती
कृषी कायद्यांविरोधात पंजाबमध्ये निदर्शने सुरूच, रेल्वेला १२०० कोटी रुपयांचे नुकसान

दिल्ली | Delhi

कृषी कायद्यांविरोधात पंजाबमध्ये आंदोलकांनी रेल्वे मार्ग रोखल्यामुळे मालवाहतूक स्थगित ठेवणे भाग पडत आहे. रेल्वे सेवेद्वारे महत्वाची धान्ये वाहून नेणाऱ्या 2225 मालवाहतूक बोगी आजपर्यंत धावू शकल्या नाहीत आणि यामुळे 1200 कोटी रुपयांहून जास्त तोटा झाला असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली आहे.

रेल्वे मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हंटले आहे, "आंदोलकांनी रेल्वे फलाट तसेच रेल्वे रुळांवर धरणे आंदोलन सुरू ठेवले आहे. आंदोलकांनी अचानक काही रेल्वेगाड्या रोखल्याने तसेच जंदियाल, नभा, तळवंडी साबो आणि भटिंडा अश्या काही तुरळक भागांमध्ये आंदोलक रेल्वे रोको करत असल्यामुळे वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षा लक्षात घेता रेल्वे वाहतूक पुन्हा थांबवण्यात आली आहे. आज 06:00 वाजता मिळालेल्या माहितीनुसार 32 जागांवर आंदोलन सुरू आहे. 26 ऑक्टोबर 2020 ला रेल्वेमंत्र्यांनी मुख्यमंत्री, पंजाब सरकारला पत्र लिहून रेल्वे मार्गाची आणि कार्यरत कर्मचाऱ्यांची सुरक्षा याबद्दल हमी मागितली आहे. पंजाबमध्ये काही भागात रेल्वे मार्ग रोखले जात आहेत, त्यामुळे मालवाहतूक तसेच शेती, व्यवसाय आणि मुलभूत जीवनावश्यक वस्तूच्या उपलब्धतेवर विपरीत परिणाम होत आहे.

पंजाब राज्यातून जाणाऱ्य़ा सर्व पॅसेंजर रेल्वेगाड्यांवरही याचा परिणाम झाला आहे. आतापर्यंत 1350 पेक्षा जास्त पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात किंवा वळवण्यात वा स्थगित करण्यात आल्या आहेत. कोविड काळात प्रवास करणाऱ्यांना यामुळे खूप गैरसोय सहन करणे भाग पडत आहे. पंजाब, जम्मू-काश्मिर, लडाख आणि हिमाचल प्रदेश या भागांमध्ये वा तेथून वाहतूक केल्या जाणाऱ्या जीवनावश्यक मालाच्या वाहतूकीवर परिणाम होत आहे. माल लादलेल्या मालवाहतूक रेल्वेगाड्या 15-20 दिवस अडकून पडत आहेत. यामुळे अनेक मालवाहतूक ग्राहकांना झालेला व्यवसायातील तोटा लक्षात घेउन ग्राहक मालवाहतुकीच्या अन्य पर्यायांकडे वळत आहेत."

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com