करोनाच्या पहिल्या लाटेनंतर गाफील राहिल्याने ‘हे’ संकट - मोहन भागवत

करोनाच्या पहिल्या लाटेनंतर गाफील राहिल्याने ‘हे’ संकट  - मोहन भागवत

नवी दिल्ली - करोनाची पहिली लाट आल्यानंतर आपण गाफील राहिल्यामुळे हे संकट उभं राहिलं. आता तिसर्‍या लाटेची चर्चा सुरू झाली आहे. पण तिला न घाबरता तिला परत फिरावं लागेल अशी तयारी आपल्याला करायला हवी, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. ऑनलाईन व्याख्यान श्रुंखलेमध्ये ते बोलत होते.

ते म्हणाले, आपल्याला भेदभाव विसरून एकत्र येऊन करोना संकटाशी लढा द्यावा लागेल, जे धैर्यवान लोक असतात, ते कायम प्रयत्न सुरूच ठेवतात. आपल्यालाही तसंच करायचं आहे. संपूर्ण भारताला एक समाज म्हणून सर्व भेदभाव विसरून, गुणदोषांच्या चर्चांमध्ये न अडकता एकसंघ बनून काम करावे लागणार आहे. एकमेकांच्या गुणदोषांची चर्चा करण्यासाठी नंतर वेळ मिळणारच आहे. अजीम प्रेमजींनी सांगितलं त्यानुसार वेगाने काम करावं लागणार आहे. पुणे शहराचे उद्योजक, प्रशासक, रुग्णालय, जनतेचे प्रतिनिधी या सगळ्यांनी एक टीम म्हणून प्रयत्न केला. सामुहिक प्रयत्न आवश्यक आहेत.

यावेळी मोहन भागवत यांनी सर्वांनीच वैज्ञानिकतेचा आधार घेण्याचं आवाहन केलं. कोणतीही चर्चा ही वैज्ञानिकतेच्या आधारावरच तपासून घेतली गेली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. वैज्ञानिकतेचा आधार घेणं आवश्यक आहे. कुणी सांगतं म्हणून ते योग्य आहे किंवा एखादी गोष्ट नवीन आहे म्हणून ती योग्य आहे किंवा जुनी आहे म्हणून योग्य आहे असं माहितीच्या बाबत करू नका. जे काही तुमच्यापर्यंत येतंय, त्याचं वैज्ञानिकतेच्या आधारावर परीक्षण करूनच त्याचा स्वीकार करा. आपल्याकडून कोणतीही निराधार बाब समाजात जाऊ नये आणि आपणही अशा बाबीचं पालन करता कामा नये याची काळजी घ्यायला हवी. आयुर्वेदाच्या नावावर अनेक चर्चा अशा सुरू असतात. पण वैज्ञानिकतेच्या तर्कावर जोपर्यंत त्या गोष्टी सिद्ध होत नाहीत, तोपर्यंत अशा गोष्टींबाबत सावध राहणं आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com