दिल्ली l Delhi

करोना विषाणूने जगभरात थैमान घातलं आहे. या प्राणघातक विषाणूने केवळ लोकांचा जीव घेतला नाही, तर जागतिक अर्थव्यवस्थाही ढासळली आहे. २०२० च्या सुरुवातीला करोना महामारी वेगाने जगभरात पसरली आणि लाखो लोकांचा बळी घेतला.

त्यातच आफ्रिका खंडातील गिनी देशामध्ये आता 'इबोला' नावाच्या विचित्र रोगाने थैमान घालायला सुरूवात केली आहे. २०१४ साली आफ्रिकेत लाखो नागरिकांचे बळी घेणाऱ्या इबोलाने पुन्हा डोके वर काढल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा इबोलाचा प्रसार झाला असून चार जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच चार जणांना संसर्ग झाला असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इबोलाचा वाढता धोका पाहता गिनी देशातील सरकारने इबोला संसर्गाला महामारी घोषित केलं आहे.

गिनी देशातील गोउइके येथील एका अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमानंतर सात लोकांना डायरिया, उलट्या आणि रक्तस्त्राव होण्याचा त्रास जाणवू लागला. गोउइके लाइबेरिया सीमेजवळच्या भागातील लोकांचे तातडीने विलगीकरण करण्यात आलं. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार संसर्ग झालेल्या व्यक्तींवर उपचार सुरु आहेत. मंत्रालयाने इबोलला महामारी जाहीर केलं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर एखादी साथ रोखण्यासाठी ज्या उपाययोजना केल्या जातात ती सर्व तयारी गिनी सरकारने केली आहे.

इबोला हा मनुष्य व इतर सस्तन प्राण्यांना होणारा एक रोग आहे. हा रोग एबोला नावाच्या विषाणूची लागण झाल्यामुळे होतो. ताप, घसादुखी, स्नायूदुखी, उलट्या इत्यदी एबोला रोगाची लक्षणे विषाणूबाधा झाल्याच्या दोन दिवस ते ३ आठवड्यांदरम्यान दिसू लागतात. त्यानंतर ६ ते १६ दिवसांत रोगी मृत्यूमुखी पडण्याची शक्यता आहे. हा रोग संसर्गजन्य असून एका मनुष्याद्वारे दुसऱ्यामध्ये पसरू शकतो. एबोला रोगावर सध्या कोणताही अधिकृत उपचार किंवा लस उपलब्ध नाही. मात्र, प्रादुर्भाव झालेल्या प्राणी व माणसांना अन्य प्राणी व माणसांपासून वेगळे ठेवत प्रचंड काळजी घ्यावी लागते.

ह्या विषाणूचा शिरकाव एखाद्या बाधित प्राण्याच्या (सामान्यत: माकडे किंवा वटवाघळे) रक्त किंवा शारीरिक द्रवपदार्थ यांच्याशी संपर्काद्वारे होतो. नैसर्गिक वातावरणात हवेतून पसरण्याबद्दल अद्याप खात्री नाही. बाधित नसताना देखील वटवाघळे हा विषाणू वाहून नेऊ शकतात आणि पसरवू शकतात असे मानले जाते. मानवी संसर्ग झाल्यानंतर मात्र, हा रोग लोकांमध्ये देखील पसरू शकतो. बाधित माकडे आणि रुग्णांपासून माणसांमध्ये या रोगाचा फैलाव कमी करणे याचा प्रतिबंधात समावेश होतो. अशा प्राण्यांना संसर्गासाठी तपासून आणि जर रोग आढळला तर त्यांना मारून आणि त्यांचे शरीर व्यवस्थित नष्ट करून हे केले जाऊ शकते. मांस व्यवस्थित शिजवणे आणि मांस हाताळताना संरक्षणात्मक कपडे घालणे, तसेच रोग्याच्या आसपास असताना संरक्षणात्मक कपडे घालणे आणि हात धुणे हे सुद्धा उपयोगी ठरू शकते.

इबोला रोगाला उच्च मृत्यूदर

विषाणूने बाधित झालेले ५०% ते ९०% बर्याचदा मृत्यू पावतात. इबोलाची ओळख १९७६ साली पहिल्यांदा आफ्रिका खंडातील सुदान आणि झैर येथे झाली. तेव्हापासून २०१३ पर्यंत आफ्रिकेमध्ये एबोलाचे १,७१६ व्यक्तींना इबोलाची बाधा झाली होती.

२०१४ इबोलाची साथ

२०१४ साली प्रामुख्याने पश्चिम आफ्रिकेमधील गिनी, लायबेरिया व सियेरा लिओन ह्या देशांमध्ये तसेच नायजेरियामध्ये एबोलाची तीव्र साथ आली असून या वर्षी एबोलाचे २०,०८१ रुग्ण आढळून आले. ह्यांपैकी ७,८४२ रुग्ण इबोलामुळे मरण पावले आहेत. या वर्षी ह्या रोगाची लागण झालेल्या सहा व्यक्ती माली देशात व एक व्यक्ती अमेरिकेत दगावली. स्पेन या प्रगत देशामध्ये देखील या रोगाचा रुग्ण आढळून आल्यामुळे जागतिक आरोग्य आणिबाणीसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. ह्या रोगाचा प्रादुर्भाव वेळीच रोखला नाही तर दर आठवड्याला १० हजार नवे रुग्ण ह्या वेगाने इबोलाची साथ वाढेल असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.