न्यूयॉर्क -

प्रसिद्ध टाईम मासिकाने उदयोन्मुख 100 नेत्यांची वार्षिक यादी प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये ट्विटरच्या वरिष्ठ वकील विजया गड्डे आणि

ब्रिटनचे अर्थमंत्री ऋषी सुनक यांच्यासह एक भारतीय कार्यकर्ता आणि पाच भारतीय वंशाच्या व्यक्तींना स्थान देण्यात आले आहे. भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद यांचा देखील या यादीत समावेश आहे.

‘2021 टाईम-100 नेक्स्ट’ या नावाने बुधवारी ही प्रभावशाली व्यक्तींची यादी प्रकाशित करण्यात आली आहे. भविष्य घडविणार्या 100 उदयोन्मुख व्यक्ती, कार्यकर्त्यांचा यात समावेश आहे. या यादीत इतर भारतीय वंशाच्या व्यक्तींमध्ये इंस्टाकार्टचे संस्थापक आणि मुख्यकार्यकारी अधिकारी अपूर्व मेहता, स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकारी संचालक शिखा गुप्ता आणि अॅपसॉलचे संस्थापक रोहन पावुलुरी यांचाही समावेश आहे.

40 वर्षीय ऋषी सुनक हे ब्रिटिश सरकारमध्ये कनिष्ठ मंत्री होते. मात्र, त्यांचे नावही कुणाला माहीत नव्हते. परंतु, गेल्या वर्षी ब्रिटनच्या कोषागाराची जबाबदारी सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर आल्यानंतर ऋषी यांचे नाव चर्चत आलेे. करोना महामारीच्या काळात महत्त्वाच्या अनुदानांना मंजुरी देण्याचे महत्त्वाचे कार्य ऋषी यांनी केल्याचे टाईममध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तात म्हटले आहे.

इंस्टाकार्टचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी 34 वर्षीय अपूर्व मेहता यांच्याविषयी टाईम प्रोफाइलमध्ये म्हटले आहे की, कोरोना काळात त्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला. किराणा सामान खरेदी करणार्या श्रमिकांना धान्य वितरण व निधीची व्यवस्था करण्याची अवघड कामगिरी मेहता यांनी सांभाळली, असेही टाईमने म्हटले आहे.

भीम आर्मीचे नेते आझाद (34) यांच्याबद्दल टाईमने म्हटले आहे, दलित समाजाला शिक्षणाच्या माध्यमातून दारिद्रयातून बाहेर काढण्यासाठी ते शाळा चालवतात आणि ते आक्रमक आहेत. जाती-आधारित हिंसाचाराच्या बळींच्या बचावासाठी ते बाइकवरून खेड्यांचा दौरा करतात. उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे 19 वर्षीय दलित मुलीवर सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात न्याय मिळवून देण्यासाठी आझाद आणि भीम आर्मीने मोहीम सुरू केली होती.

दरम्यान, टाईम मासिकाची ही यादी जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींच्या टाईम 100 सिरीजचा विस्तार आहे.