
मुंबई | Mumbai
कॅनडामध्ये विमान कोसळून दोन प्रशिक्षणार्थी वैमानिकांसह तीन जणांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही प्रशिक्षणार्थी वैमानिक मुंबईचे रहिवासी आहेत. अभय गडरु आणि यश विजय रामुगडे अशी त्यांची नावं आहेत. ब्रिटिश कोलंबिया प्रांतात येणाऱ्या व्हँकूअरपासून 100 किलोमीटरवर विमानाला अपघात झाला.
अपघातग्रस्त विमान आकारानं लहान आहे. विमानतळाजवळ असलेल्या मॉटेलच्या (हायवेवरील हॉटेल) परिसरात विमान कोसळलं. अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. त्यात दोन भारतीयांचा समावेश आहे. हे दोघे प्रशिक्षणार्थी वैमानिक होते. अपघाताची माहिती दोघांच्या कुटुंबियांना देण्यात आली आहे.
या अपघातात सार्वसनिक ठिकाणाला नुकसान झालेले नाही. विमानाचा अपघात झाल्याचे समजताच बचाव पथक घटनास्थळी पोहोचले होते. या प्रकरणात अपघाताच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्यासाठी तपास केला जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.