दिल्ली । Delhi

राजधानी दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबादमधील मुरादनगर येथे दुर्दैवी घटना घडली आहे. एका मृत व्यक्तीवर अंत्यंसंस्कार सुरु असताना अचानक स्मशानभूमीचं छतच कोसळलं. ज्याच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याने 21 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेकजण ढिगाऱ्याखाली दबले गेले असून, बचावकार्य सुरू आहे.

दिल्ली आणि राजधानीच्या परिसरात आज सकाळी हलका पाऊस पडत होता. त्यामुळे आडोसा म्हणून 25 जण स्मशानभूमीच्या छताखाली थांबले होते. त्यावेळी हे छत खाली उभ्या असलेल्या नागरिकांच्या अंगावर कोसळले. ही घटना घडली त्यावेळी स्मशानभूमीमध्ये राम धन नावाच्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार केले जात होते. छताखाली थांबलेले बहुतेक जण राम धन यांचेच नातेवाईक होते.

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले असून छताचा ढिगारा हटवून जखमींना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्याचे काम लगेच सुरू केले गेले. काही जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे गाझियाबाद ग्रामीण पोलीस अधिक्षक इराज राजा यांनी सांगितले.

या दुर्घटनेबद्दल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुःख व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपये आर्थिक मदत म्हणून जाहीर केली आहे. अपघातात जखमी झालेल्यांवर योग्य उपचार होतील याकडे लक्ष देण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.