
धनबाद | Dhanbad
देशात वारंवार अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असताना आता आणखी एक अपघाताची धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका इमारतीला लागलेल्या भीषण आगीमध्ये तब्बल १५ लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये १० महिला, ३ मुलं आणि एका पुरूषाचा समावेश आहे.
झारखंडमधील धनबाद इथल्या एका रहिवासी इमारतीला भीषण आग लागली. धनबाद येथील मोड पोलीस ठाणे परिसरात शक्ती मंदिराजवळ आशीर्वाद ही इमारत आहे. सायंकाळच्या सुमारास या इमारतीत भीषण आग लागली.
आगीची माहिती मिळताच अग्निमशन दलाच्या गाड्या आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण आणण्याचे काम अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून सुरु आहे.
दरम्यान, आगीच कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण सध्या बचाव कार्यावर आम्ही लक्ष केंद्रीत केलं असून जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक संजीव कुमार यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी म्हटलं की, धनबाद येथील आशीर्वाद इमारतीत लागलेल्या आगीत अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. ही घटना अत्यंत दु:खद आहे. जिल्हा प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री सोरेन यांनी दिली.