
नवी दिल्ली - वृत्तसंस्था New Delhi
या महिन्यात दक्षिण आफ्रिकेतून (South Africa) आणखी १२ चित्ते (Cheetah) भारतात (India) आणले जाण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी मंगळवारी दिली. हे १२ चित्ते मध्य प्रदेशातील कुनो अभयारण्यात स्थलांतरित करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे. हे चित्ते या जानेवारीतच येण्याची शक्यता असल्याचे केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या (Union Ministry of Environment) सूत्राने सांगितले.
कर्नाटकातील बांदीपूर व्याघ्र प्रकल्पातील राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाच्या (एनटीसीए) विसाव्या बैठकीत कुनो राष्ट्रीय उद्यानाच्या अधिकाऱ्यांनी सात नर आणि पाच मादी असलेल्या या १२ चित्त्यांना सामावून घेण्यासाठी केलेल्या तयारीचे सादरीकरण केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दक्षिण आफ्रिकेत गेल्या सहा महिन्यांपासून हे चित्ते विलगीकरणात ठेवलेले आहेत. त्यांच्या आंतरखंडीय हस्तांतरणासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी होणे बाकी आहे.