औरंगाबादेत हर्निया तज्ज्ञांची राष्ट्रीय परिषद

देशभरातील ४५० डॉक्टरांचा सहभाग
औरंगाबादेत हर्निया तज्ज्ञांची राष्ट्रीय परिषद

औरंगाबाद - aurangabad

'हर्निया सोसायटी ऑफ इंडिया' च्या १५ व्या राष्ट्रीय परिषदचे औरंगाबादमध्ये आयोजन करण्यात आले असून १२ व १३ नोव्हेंबर रोजी देशभरातील ४५० हर्निया तज्ञ डॉक्टर, सर्जन यात सहभागी होतील. परिषदेत हर्नियावरील उपचार व शस्त्रक्रियेच्या अत्याधुनिक पद्धतीवर चर्चा होईल. यावेळी लाईव्ह ऑपरेशनद्वारे शस्त्रक्रियेच्या नवीन तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक दाखवले जाईल. शोध निबंध सादर केले जातील. कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत हे आयोजन केल्याची माहिती ऑर्गनायझिंग चेअरमन (Dr. Vijay Borgaonkar) डॉ.विजय बोरगांवकर यांनी दिली.

'हर्निया सोसायटी ऑफ इंडिया' ही देशभरातील हर्निया तज्ञांची १५ वर्षांपूर्वी स्थापन झालेली राष्ट्रीय संघटना आहे. दरवर्षी सोसायटीची परिषद घेतली जाते. गतवर्षी कोरोना संसर्गकाळामुळे ऑनलाईन परिषद घेण्यात आली. यापूर्वी दोन वेळेस औरंगाबादमध्ये हे आयोजन झाले आहे. यंदा तिसऱ्यांदा औरंगाबादला राष्ट्रीय परिषदेचे यजमानपद भूषवण्याचा मान मिळाला आहे. हॉटेल रामा इंटरनॅशनलमध्ये १२ आणि १३ नोव्हेंबर रोजी परिषद होईल. औरंगाबाद सर्जिकल सोसायटी, कृपामयी हॉस्पिटल आणि सेठ नंदलाल धूत हॉस्पिटल या परिषदेचे आयोजक आहेत.

शस्त्रक्रियेचे थेट प्रक्षेपण

दोन दिवस तज्ञांची भाषणे, पॅनल डिस्कशन, चर्चासत्रे अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हर्नियावरील शस्त्रक्रियेचे थेट प्रक्षेपण हे परिषदेचे आकर्षण ठरेल. कृपामयी हॉस्पिटलच्या अत्याधुनिक ऑपरेशन थिएटरमध्ये तज्ञ सर्जन गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करतील. त्याचे थेट प्रक्षेपण रामा हॉटेलमध्ये केले जाईल. फेसबुक लाईव्ह व अन्य व्हर्चुअल प्लॅटफॉर्मद्वारे त्याचे जगभरात प्रसारण होईल. परिषदेत ३० शोध निबंधांचे सादरीकरण केले जातील. तसेच हर्नियावरील शस्त्रक्रियेशी संबंधित उत्पादनांची माहिती देणारे प्रदर्शनही आयोजित केल्याचे डॉ. विजय बोरगांवकर म्हणाले.

मान्यवरांचे मार्गदर्शन

या राष्ट्रीय हर्निया परिषदेत ४५० डॉक्टर, सर्जन आणि हर्निया क्षेत्रातील तज्ञ सहभागी होतील. त्यापैकी दीडशे प्रत्यक्ष तर उर्वरित व्हर्चुअल प्लॅटफॉर्मवर सहभाग नोंदवतील. काही डॉक्टर परदेशातूनही ऑनलाईन सहभागी होतील. नवी दिल्लीतील एम्सचे माजी संचालक प्रा. एम. सी. मिश्रा यांना मानाचा 'एच. जी. डॉक्टर ओरेशन' दिला जाईल. हर्निया सोसायटीचे संस्थापक सदस्य डॉ. प्रदीप चौबे यावेळी मार्गदर्शन करतील. सोसायटीचे अध्यक्ष रमेश अग्रवाला, सचिव डॉ. मनीष बैजल, कोषाध्यक्ष डॉ. रणदीप वाधवान आणि हर्निया सोसायटीचे समिती सदस्य सहभागी होतील. नवी दिल्लीचे विख्यात सर्जन डॉ. अजय कृपलानी, डॉ. पवनिंद्र लाल आणि मुंबईचे डॉ. दीपराज भांडारकर यांची प्रमुख उपस्थिती राहील.

यापत्रकार परिषदेला ऑर्गेनायझिंग चेअरमन डॉ. विजय बोरगांवकर, औरंगाबाद सर्जिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. निखिल चव्हाण, सचिव डॉ. नारायण सानप, डॉ. सुशील देशपांडे, डॉ. भास्कर मुसंडे आदींची उपस्थिती होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com