नाशिक-पुणे रेल्वे भूसंपादन मोबदल्यात वाढ करा

बाधित शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाचे खा. गोडसे यांना साकडे
बाधित शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाचे खा. गोडसे यांना साकडे
बाधित शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाचे खा. गोडसे यांना साकडे

सिन्नर। Sinnar

नाशिक-पुणे (Nashik pune railway line) प्रस्तावित रेल्वे मार्गासाठी जाणाऱ्या जमिनीपोटी मिळणारा मोबदला फारच कमी असून शेतकऱ्यांच्या भविष्याचा विचार करता त्यांना अधिकाधिक मोबदला मिळवून द्यावा अशी आग्रही मागणी आज (दि.27) तालुक्यातील वडझिरे येथील बाधित शेतकऱ्याच्या शिष्टमंडळाने खा. हेमंत गोडसे यांच्याकडे केली....

शेतकऱ्यांची मागणी न्यायिक असून शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा अधिकाधिक मोबदला मिळून देण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही यावेळी खा. गोडसे यांनी दिली.

जिल्ह्यातील विविध प्रकल्पांसाठी शेकडो शेतकऱ्यांनी आजपर्यंत आपल्या जमिनी दिल्या आहेत. यामध्ये सिन्नर, नाशिक आणि इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. आज या तालुक्यांतील शेतकऱ्यांकडे खुपच कमी जमिनी शिल्लक आहेत. विविध प्रकल्पांना जमिनी द्याव्या लागल्याने शेतकरी उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.

खा. गोडसे यांच्या सततच्या पाठपुराव्यातून नाशिक-पुणे रेल्वेमार्ग होऊ घातला आहे. या प्रकल्पासाठी 16 हजार कोटी खर्च येणार असून त्यातील 20 टक्के निधी राज्य शासन आणि 20 टक्के निधी केंद्र शासन देणार आहे. 60 टक्के निधी हा एक्वीटीमधून उपलब्ध झाला आहे.

16 हजार कोटींंपैकी सुमारे 3 हजार कोटी रुपये प्रकल्पासाठी लागणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी करण्यासाठी खर्च करण्यात येणार आहे. या मार्गासाठी सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मोठया प्रमाणावर जमिनी जाणार असून त्या बदल्यात मिळणारा मोबदला खूपच कमी असल्याने बाधित शेतकऱ्यांमध्ये चिंता वजा संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

त्यामुळे वडझिरे येथील शेतकऱ्यांनी खा. गोडसे यांची भेट घेत अधिकाधिक मोबदला मिळवून देण्याची मागणी केली. या भागातील जमिनी औद्योगिक वसाहतीपासून अवघ्या 1 कि.मी. अंतरावर असून समृध्दी महामार्ग आणि हायवे हाकेच्या अंतरावर आहे.

सदर जमिनी बागायती असून या जमिनींना हेक्टरी 86 लाख तर जिरायतीसाठी हेक्टरी 26 लाख इतकाच भाव मिळत आहे. बाजारभावापेक्षा शासनाकडून मिळणारा भाव खूपच कमी आहे . यापूर्वी पुणे महामार्ग, समृध्दी महामार्ग आणि एम. आय. डी. सी. साठी जमिनी गेल्याने परिसरातील शेतकरी अल्पभूधारक झालेले आहेत.

आता पुन्हा नाशिक-पुणे रेल्वेमार्गासाठी जमिनी जाणार असल्याने शेतकरी देशोधडीला लागणार आहेत. अशा व्यथा शेतकऱ्यांनी मांडत जमिनीपोटी मिळणाऱ्या मोबदल्यात भरीव वाढ करावी अशी मागणी खा . गोडसे यांच्याकडे केली आहे . यावेळी शिवाजी बोडके, रामेश्वर बोडके, बाळासाहेब बोडके, जयराम गिते, मनोहर बोडके, पंडीत बोडके, निवृत्ती दराडे, किसन सानप, देविदास सांगळे यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

शासनाने जमीन अधिग्रहणासाठी 3 हजार कोटी रुपये मंजुर केलेले असले तरी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सदर रक्कम ही सुमारे साडे तीन ते चार हजार कोटीपर्यंत नेण्यासाठी आपण प्रयत्न करु अशी ग्वाही यावेळी खा. गोडसे यांनी दिली.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com