कथा : आधुनिक राधा

कथा : आधुनिक राधा

ओंकारने घड्याळात बघितले, रात्रीचे १२ वाजायला अजून थोडा अवधी होता. अजून दोन तासांनी राधाचे फ्लाईट सुटणार होते. बरोबर दोन  वर्षांपूर्वीची राधा त्याच्या डोळयासमोर आली.

राधा त्याच्या टीममधील एक लीडर. अत्यंत हुशार, कामाला सदैव तयार आणि खास करून टीमचे अंतर्गत प्रश्न सोडवायला एक पाऊल पुढे. तिच्या वागण्याने सर्वांना पटकन आपलीशी वाटणारी. नवीन ज्युनियर लोक तिला मानत होते. तितकेच तिचे सहकारी. ॲपरेजल पूर्ण करण्याचा शेवटचा दिवस.

टीममधील इतर मेंबरचे ॲपरेजल राधाने पूर्ण केले होते. आता तिचे स्वतःचे बाकी राहिले होते. तिची आणि ओंकारची मिटींग चालू होती. राधाच्या कामाबद्दल शंकाच नव्हती. तरीही आपला बाॅस इतक्या सहजासहजी सर्व गोष्टी मान्य करतो आहे, हे बघून राधाच्या मनांत शंका येत होती.

काहीच विरोध न करता ओंकारने तिचे ॲपरेजल पूर्ण केले. तरी सुध्दा ॲाफिसातून निघायला दहा वाजले होते. ओंकारचे सहजच लक्ष गेले राधा अजून काम करत होती. त्याने तिला विचारले की “मी तुला कुठे ड्राॅप करू का?” राधा पटकन तयार झाली आणि त्याच्याबरोबर निघाली.

साधारण दोन महिने झाले होते. ओंकारचे कामात लक्ष लागत नव्हते. बहुतेक वेळी तो घरून काम करत होता. याची उडत उडत ॲाफिसमधे चर्चा होत होती. म्हणूनच कारमध्ये बसताना तिने ओंकारच्या मनाची तार छेडली. “सर, एक प्रश्न विचारते, रागावू नका. घरी काही प्रॅाब्लेम आहे का?”

समोरच्याने इतका स्ट्रेट बाॅल टाकला होता. तरीही गुगली बाॅलला क्लीनबोल्ड व्हावे तशी ओंकारची विकेट पडली. अनपेक्षित प्रश्नाने ओंकार गोंधळून गेला. नक्की काय उत्तर द्यावे त्याला सुचत नव्हते. त्याने गाडी चालू केली आणि नेहमीप्रमाणे रेडीओ चालू केला. काही क्षणात रेडिओवर गाण सुरू झाले “जब कोई बात बिघड जाए तुम देना साथ मेरा” रेडिओ बंद करत राधाने त्याला परत प्रश्नाची आठवण करून दिली. “सर……काही टेन्शन आहे का?” आता ओंकारला आपला आतला ताण सहन झाला नाही. तो बोलू लागला. अनेक दिवस कोंडलेली वाफ बाहेर पडू लागली.

“अग, प्रेम करणे यात काही गुन्हा आहे का? मी तो केला आणि त्याची जबरदस्त शिक्षा मला आता भोगावी लागत आहे.”

“असं का म्हणतात तुम्ही?”

“मी आणि अस्मी एकाच काॅलेज मध्ये होतो. मुंबईत शिक्षण-नोकरी चांगली मिळेल. आपले एक छान मोठे घर हवे. खूप छान सजवलेले. असे तिचे स्वप्न होते. तिचे सौंदर्य म्हणजे कश्मीर की कली. त्याचबरोबर तितकाच गोड आवाज. काॅलेजच्या कार्यक्रमांतून आमची ओळख झाली. काॅलेज संपले.

नोकरी सुरू झाली. आयुष्यातील एक एक पायरी आम्ही चढत होतो. सर्व काही सुखात चालू होते. ओमच्या जन्मानंतर मात्र तिचे वागणे हळूहळू बदलू लागले. ती फारशी बोलत नव्हती. गप्प गप्प राहायची. मला वाटले कदाचित प्रेगन्सीमुळे असेल हा बदल. मुलगा मोठा झाला की फरक पडेल.”

रात्रीच्या वेळी सरांनी इतकी अचानक सिग्नल जवळ ब्रेक दाबून गाडी थांबवली; तेव्हा एक क्षण राधादेखील भांबावून गेली.

“तिच्या मनातलं मी ओळखू शकलो नाही. दोन महिन्यापूर्वी ती अशी अचानक आम्हाला सोडून गेली. पहिले पंधरा दिवस ओमने रडून रडून गोंधळ घातला होता. मग तो पूर्ण गप्प झाला. तो कोणाशी बोलत नाही. पुढे काय करावे समजत नाही. सर्व गोष्टी झाल्या. पोलिसांमध्ये तक्रार. शोध. अस्मीचे माहेर काश्मीर मधील. तिच्या माहेरची नीट माहिती नाही म्हणून पोलिसांनी मलाच धारेवर धरले. कुठेही यश येत नाही.”

पुढचा प्रवास पूर्णपणे शांततेत गेला. राधा आपल्याच विचारात घरी गेली. असाच एखादा महिना गेला असेल.

नंतर एका सुट्टीच्या दिवशी राधा ओंकारच्या घरी गेली. ओमशी गप्पा गोष्टी करत थोडा वेळ गेला. राधामुळे ओमची कळी जरा खुलली. त्यामुळे ओंकारलासुध्दा बरे वाटले. नंतर जेव्हा जमेल तेव्हा राधा ओमला वेळ देत होती. कधी बाहेर घेऊन जाणे. कधी कार्टून फिल्म तर कधी नुसतेच आईस्क्रीम. ओमच्या बरोबर राधा ओंकारच्या आवडी निवडी देखील जपू लागली, हे तिला देखील समजले नाही.

त्या दोघांचे एकत्र जाणे-येणे ॲाफिसमधील लोकांच्या नजरेत येऊ लागले होते. आपण ओंकारची “ॲाफिस वाईफ” बनतां बनतां त्याच्या खाजगी जीवनात प्रवेश करतो आहे, याची जाणीव राधाला होत होती. आपलं कुठेतरी चुकतंय अशी अपराधीपणाची भावना ओंकारच्या मनात डोकावत होती. कळत नकळत दोघे एकमेंकाकडे खेचले जात होते. त्या भावना व्यक्त करायला दोघेही घाबरत होते. “आपण अस्मीसाठी अजून किती वर्षे थांबायचे?” हा प्रश्न अधून मधून ओंकारला सतावत होता.

राधाच्या आयुष्यातली ही फेज तिच्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या काकांना माहीत होती. “आपण यावर काहीतरी तोडगा काढू” असे आश्वासन त्यांनी तिला दिले होते.

राधाचे काका पोलिस मधून रिटायर्ड झालेले. फोटोग्राफीची आवड. काही फोटो शूट करायला ते काश्मीरला गेले होते. बाॅर्डरजवळचे गाव.

“चाय देना चाचाजी।”

“हाँ । अभी लाता हूँ । आप बैठो ज़रा। मौसम कैसे हो गया है । कभी भी पानी बरस रहाँ है। ऐसे मौसम में चाय और पकोड़े होने चाहिए । चाय के साथ पकोड़े भी लेंलो साब।” “हाँ… हाँ ।  ठीक है ।” “बिटिया चाय और पकौड़े दे देना ज़रा। “

“ कहाँ से आये हो?” “बंबईसे।” “कभी देखी है बंबई?” काकांच्या प्रश्नावर चाचाजींचा चेहरा बदलला. गप्पांचा नूर बदलला. हवा-पाण्यातील बदल यावर गप्पा चालू झाल्या. इतक्यात बिटिया चहा-पकौड़े घेऊन आली. तिला बघून का समोरचे गरम पकौड़े बघून, काकांचे तोंड कशामुळे बंद झाले ते कळले नाही. त्यांचे डोळे त्यांना धोका देणे शक्य नव्हते. तिथले बील लगबगीने चुकते करून ते बाहेर पडले. त्यांनी खटपट करून राधाला तिथे बोलवून घेतले. दोन दिवसात राधा तिथे पोहोचली. दोघेजण पोलिसांना घेऊनच चाचाजींच्या टपरीवर गेले. चाचा घाबरले.

“अस्मी आप की बिटिया है?” पोलिसांच्या बुलंद आवाजाने चाचाजी पार कोलमडून गेले. “नहीं। हां। …..क्यों क्या हुआ?” बोलताना चाचाजी बिथरले.  “ये आप की बिटिया है और आप को पता नहीं? ये बंबईसे अपना घर छोड़कर भाग के आई है? हम अभी इसे साथ लेके जाएँगे ।”

प्रथम पासून अस्मीने आपली खरी ओळख आपल्या नवऱ्यापासून लपवून ठेवली होती. तिचे वडील लहानपणीच वारले होते. चाचाजींच्या घरात एकत्र कुटुंबात अस्मी, तिची आई आणि तिचा लहान भाऊ राहात होते. चाचीजींनी तिच्या लहान भावाला फसवून दहशतवादी संस्थेत धाडले होते. चाचाजींची नजर आता अस्मीवर होती. त्या संघटनेच्या म्होरक्याला तिला विकायची त्यांची तयारी चालू होती. म्हणूनच आईच्या मदतीने तिने तिथून पळ काढला होता. आपले पूर्वायुष्य विसरून तिने स्वतःची नवीन ओळख बनवली होती. आईसुध्दा आपल्या लेकीसाठी मूग गिळून सर्व अत्याचार सहन करत होती.

काळ पुढे धावत असला तरी चाचाजीं अस्मीच्या मागावर होतेच. अनेक वर्षांनंतर अस्मीचा गळ त्यांच्या हाताशी परत एकदा आला. अस्मीने हिंदू मुलाबरोबर केलेले लग्न त्यांना अमान्य होते. कट्टर , जहाल तो धर्मवादी माणूस सूडाने , रागाने पेटून उठला होता. चाचाजी आता अस्मीला सोडून देणे शक्य नव्हते.

चाचाजींनी प्रथम ख्याली-खुशालीचे मेसेज पाठवून तिचा विश्वास संपादन केला. मग एक दिवस डाव साधला. गावात दंगाफसा झाला आणि भाऊ चुकून मारला गेला असे कळविले. त्यातूनच बुढी अम्मा कशी वेडी झाली आहे, याचा व्हिडिओ पाठवला. आपल्या बुढी अम्माची अवस्था पाहून अस्मी कोलमडून गेली. एकीकडे नवरा हेच आपलं वर्तमान आहे. भाऊ गमावला; पण आता मुलाला सोडतां काम नये. हे तिला पटत होते.

मुलाचे भविष्य तिला खुणावत होते. त्याचवेळी अम्मीच्या आठवणी तिला स्वस्थ बसून देत नव्हते. मन बेचैन झाले होते. या दोलायमान अवस्थेत ती एक दिवस घरातून अचानक निघून गावी पोहोचली. चाचाजींची चाल यशस्वी झाली. त्यांच्या मनाप्रमाणे जाळ्यात अडकली ती.  तिथे गेल्यानंतर पहिले अनेक महिने त्यांनी तिला आणि अम्मीला एका खोलीत बांधून ठेवले. तिचे परत फिरायचे दोर चाचाजींनी कापून टाकले. याचा परिणाम अस्मीच्या शारिरिक आणि मानसिक स्वास्थावर झाला होता. गेली एक-दीड वर्षे अस्मी त्यांच्या हातातील खेळणं झाली होती.

गेले एक वर्षे एक शब्द न बोललेली अस्मी ओमचा फोटो बघून धाय मोकलून रडू लागली. तिची अम्मी बोलली, “बिटियॉं ये बुढ़िया का फ़िक्र मत कर। वो तो अब मर चुकी हैं। तू तेरे घर लौट जा।” पोलिंसापुढे चाचाजींचे काहीच चालले नाही.

अस्मीला घेऊन काका आणि राधा मुंबईला परत आले. तिची शारीरिक आणि मानसिक अवस्था बघता तिला हाॅस्पिटल मध्ये दाखल करणे जरुरीचे होते. ती हातात धरलेला ओमचा फोटो घेऊन अखंड रडत होती.

राधा ॲाफिसमधे काही न सांगता चार दिवस अचानक सुट्टीवर गेली होती. ओंकारच्या डोक्याभोवती असंख्य प्रश्न घिरट्या घालत होते. त्याचा मोबाईल वाजला. नाव बघताच काहीशा रागानेच त्याने  उचलला. राधाने ओंकारला संध्याकाळी हाॅस्पिटलमध्ये बोलवले ते सुध्दा ओमला घेऊन. राधाला अचानक काय झाले? तिची तब्येत बिघडली तर आधी का नाही कळवले? ॲाफिसचे काम आधीच अडलेले आहे आणि आता राधा अजून सुट्टीवर गेली तर? दिवस कसाबसा ढकलला.

संध्याकाळी ओमला घेऊन तो हाॅस्पिटलच्या रूमवर पोहोचला. अस्मीला बघून ओमने विचारले “ही तर फोटोमधील ॲांटी आहे ना? राधा ॲांटी कुठे आहे?” ओंकार सुध्दा त्याच्या इतकाच गोंधळून गेला होता. राधाने ओंकारला झालेला सर्व प्रकार सांगितला. अस्मीला कदाचित अजून काही दिवस हाॅस्पिटमध्ये राहायला लागणार होते.

ओंकारपुढे प्रश्नचिन्ह उभे राहिले. एकीवर त्याने मनापासून प्रेम केले होते. दुसरीने त्याला सावरायला मदत केली होती. दोघांमधील मैत्रीची व्याख्या बदलत चालली होती. ओम नक्की कोणाचा स्वीकार करेल? आपण अस्मीला परत स्वीकारू शकू का? असे झाले तर राधाला काय वाटेल? ती आपल्याला काय म्हणेल? नशिबाने आणून ठेवलेल्या या वाटेवर पुढचा मार्ग त्याला दिसत नव्हता.

हाॅस्पिटलमधील देखरेखीखाली अस्मीची तब्येत सुधारत होती. आज सांयकाळी अस्मीला हाॅस्पिटलमधून घरी सोडणार होते. एका विमनस्क अवस्थेत ओंकार ॲाफिसला पोहचला. राधाबद्दल त्याला अपराधीपणाची भावना येत होती. राधाशी कसे बोलायचे याचा तो विचार करत होता.

सवयीप्रमाणे त्याने इनबाॅक्स उघडला. पहिलीच ईमेल राधाच्या राजीनाम्याची दिसली. ती शहरच नाही तर देश सोडून चालली होती. तिचा निर्णय झाला होता. तिचा ॲाफिसमधील शेवटचा दिवस होता. राधाच्या निर्णयावर आपला काहीच अधिकार नाही, याने तो अस्वस्थ झाला होता.

ॲाफिसमधील सोपस्कार उरकून ती निघणार इतक्यात ओंकारने तिला काॅफीचे आमंत्रण दिले. “तूही पळून जाण्याच्या विचारात होतीस ना?” “नाही सर.” ओंकार तिच्या डोळ्याला डोळा भिडवू शकत नव्हता. एकच प्रश्न विचारतो, “अगं एखादी जवळची जीव लावणारी मैत्रीणच असं वागू शकते.

मला आणि ओमला जीव लावून निघून जायचे होते तर इतकी जवळ का आलीस? या वेड्या मित्रासाठी कायमची राहाशील का अशीच मैत्रीण म्हणून?” त्याच्या डोळ्यातील पाणी त्याने रोखून धरले नाही. तर ओंकारच्या प्रश्नाचे उत्तर राधाजवळ नव्हते. “सर, येणार काळच या प्रश्नाचे उत्तर देउ शकेल. मी कोणतीही गोष्ट नेहमी मनापासून आनंदाने करते. आपल्या जवळच्या माणसाला आपल्या वागण्याने आनंद झाला तरच त्याला प्रेम म्हणायचे.”

काॅफीचा शेवटचा घोट पिताना राधाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे तो बघत राहिला. आजची काॅफी त्याला जरा गोडच लागत होती.

आयुष्यात अजून गुंतायचे नाही, हे तिने आपल्या मनाला बजावले होते. आपण केलेल्या कृतीचे मानसिक समाधान तिला होते. राधासारखेच उदात्त प्रेम तिने केले. “अस्मीच्या आयुष्याला सुरुंग लावून स्वतःचा सुखी संसार करणे” तिच्या पचनी पडत नव्हते. राधा आपुल्या आयुष्यातील एका नव्या अध्यायाला सुरवात करायला निघाली होती. आपल्या निर्णयावर अभिमान बाळगणाऱ्या आपल्या लाडक्या काकाला हसतमुखाने हात हलवत राधा सिक्युरीटी गेटमधून आत शिरत होती.

“सध्याच्या आपमतलबी जगात अशी निरपेक्ष मैत्रीण मिळणे, हे आपले भाग्य नाही का?” असा विचार करत ओंकारने मनातून राधाच्या भवितव्यासाठी शुभचिंतन दिले आणि शांत, निरागसपणे झोपलेल्या अस्मी आणि ओमकडे बघत तोदेखील झोपायला गेला.

वीणा आशुतोष रारावीकर, मुंबई

ईमेल : var1303@gmail.com

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com