पारावरच्या गप्पा ! कोरोना : लॉक डाऊन म्हणजे काय रे भाऊ?
आवर्जून वाचाच

पारावरच्या गप्पा ! कोरोना : लॉक डाऊन म्हणजे काय रे भाऊ?

Gokul Pawar

Gokul Pawar

(सरपंच, दाम्या, तुळश्या, रंग्या, तुका पाटील अन तरुण पोरं घरात बसलेली )

सरपंच : पाटील, शहराकडं परिस्थिती लय हाताबाहेर चाललीय..
तुका पाटील : व्हय.. एक एक करीत सरकारने सगळ्या सेवा बंद केल्यात.. अन आज देशच बंद हाय..
सरपंच : व्हय तर.. सगळ्या देशातून प्रतिसाद मिळाला..
दाम्या : व्हय तर आपनबी चांगला सहभाग घेतला..

सरपंच : पर दुपारच्याला मुख्यमंत्र्यांनी परत घोषणा केलीया ..
तुका पाटील : ती मंबई बंद करायची..
सरपंच : व्हय , ते तर झालंच पण समद राज्यात काय म्हणत्यात ना ते केलंय , काय रे पोराहो…
संत्या : ते होय, जमावबंदी लागू केली नव्ह..
सरपंच : अजून बी एक हाय ते लोकडाऊन का काय?
संत्या : त्याला लॉक डाऊन म्हणत्यात?
दाम्या : म्हंजी काय असत..

संत्या : लॉक डाऊन म्हंजी समद बंद..
तुळश्या : अरे , ते त आम्हाला बी माहिती हाय , कि आता समद बंद हाय म्हणून..
दाम्या : ह.. हे काय ते सांग ?
संत्या : आव, लॉक डाऊन म्हंजी समदच बंद..
रंग्या : अय लका, नीट समजून सांग ना..
तुका पाटील : व्हय व्हय..

संत्या : अहो, आता कस समदं बंद केलंय , पण अन्न धान्य, किराणा , दूध, भाजीपाला, दवाखाना बंद न्हाय… बरोबर..
सरपंच : व्हय बरोबर,
संत्या : मग लॉक डाऊन मंदी समदं बंद केलं जात.. म्हंजी जे आता चालू आहे ते पण ..
तुका : काय सांगतो… म्हंजी दवाखाने पण..
संत्या : हे समदं, सरकारवर अवलंबून असतं ..
दाम्या : मला एक प्रश्न पडलाय कि आता कशाला घोषणा केली ?

संत्या : दामू काका , सध्या देशात संकट आलं आहे, म्हणजे आणीबाणीचा काळ, अशावेळी लॉक डाऊनची घोषणा केली जाते.
तुका पाटील : व्हय बराबर हाय, आता ह्या कोरोना व्हायरसमूळ देशात आणीबाणीच आली हाय..
सरपंच : संत्या, अजून काय काय केलं जात या लोकडाऊन मदी..
संत्या : हे पहा, लॉक डाऊनच्या मदी अत्यावश्यक, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व सेवा बंद ठेवल्या जातात. जमावबंदी केली जाते. आजार पसरू नयेत म्हणून दक्षता या काळात घेतली जाते.

तुका : काय र संत्या, जर समजा आपल्या गावात हा व्हायरस आला तरी अशावेळी काय करता येईल ? असं व्हनार न्हाय पण उपाय शोधलेला बरा ..
संत्या : जर आपल्या गावात किंवा परिसरात धोका निर्माण झालं तर राज्य सरकार त्या गावातील नागरिकांना दुसऱ्या ठिकाणी पाठवू शकतं. नाहीतर घराबाहेर न पडण्यास सांगू शकतं.
तुका पाटील : पण हे कोण ठरविलं ?
संत्या :याचे अधिकार फक्त सरकारलाच असतात. तसेच त्या ठिकाणच्या परिस्थितीवर अवलंबून असतं.
सरपंच : संत्या, भारी माहिती सांगितलीस लेका, गावातल्या समद्या लोकांना याची माहिती झाली पाहिजे… घरघरात दवंडी पिटवा…

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com