पारावरच्या गप्पा : महिला अजुनबी ‘दीन’च….
आवर्जून वाचाच

पारावरच्या गप्पा : महिला अजुनबी ‘दीन’च….

Gokul Pawar

Gokul Pawar

(रंग्या, दाम्या, तुळश्या, भग्या, विज्या, संत्या ही बसलेली )

दाम्या : काय र रंग्या, काय झालं असं बसायला?
तुळश्या ; बायकोशी भांडण झालं असलं….
रंग्या : हो तर, सकाळी सकाळी बायकोने डोकं खाल्लं..
तुळश्या : काय झालं असं..

रंग्या : अर कालच्याला अंगणवाडीत महिलांचा कार्यक्रम व्हता.. तर म्या..
दाम्या : तर त्वा जाऊ दिल नसलं..
रंग्या : न्हाय तसं… तिला साडी नव्हती म्हणून रुसून बसली व्हती…
तुळश्या : आयला रंग्या , अजून तू बायकोला साडी घेऊन दिली न्हाय व्हय..
रंग्या : अर मोक्कार साड्या हायीत. पण काल महिलांचा कार्यक्रम असतो त्यो, त्याच्यात गुलाबी रंगाची साडी पाहिजे व्हती..
दाम्या : कंचा कार्यक्रम ? ( तेवढ्यात तुका पाटील येतो.. )

तुक्या : त्यो व्हय, महिलादिनाचा कार्यक्रम व्हता.. झ्याक झाला.
तुळश्या : म्हंजी काय असतंय त्यात ..
तुक्या : अर या दिशी, महिलांचा दिवस असतोय, तो सगळीकडे साजरा करत्यात.. गावाकडं बी सुरु झालाय आता..
तुळश्या : व्हय व्हय… भारीच कार्यक्रम असतोय म…
संत्या : हा फकस्त महिलादिनाच्या दिशीच यांना जाग येते… महिला दिन साजरा करण्याची ?
रंग्या : काय म्हणतोय हा ?
विज्या : रंगभाऊ बरोबर म्हणतोय , त्यो तुला नाही समजणार ?
तुळश्या : अर पण झालं काय?

संत्या : अहो, मामा शहरात पाहिलं का? महिलांना आजही किती त्रास होतो ते… एक झाली का एक बातमी हायेच कानावर .. आज इथं उद्या तिथं.. शहरात न्हाय का गावाकडं कुठंच महिला सुरक्षित न्हाईत..
तुक्या : होणं, म्या एवढ्यात बऱ्याच बातम्या ऐकल्या .. पण सामान्य नागरिक काय करणार.. त्यात आपण गावाकडची माणसं..
भग्या : गावाकडची म्हणून काय झालं.. आवाज तर उठवू शकतो ना… अहो तात्या इथं चटका लागला तरी जीवाची लाही लाही होते… मुलींना पेटवून देतात हो… यांचे हात कसे धजावतात…
संत्या : अन म्हणे आम्ही महिला सक्षमीकरणासाठी महिला दिन साजरा करीत आहोत… अहो कसलं काय सगळं इव्हेंट मॅनेजमेंट
तुक्या : खरं हाय पोराहो, तुमचं… गेल्या काही वर्षात महिला अत्याचारात खूपच वाढ झालीय..

संत्या : तात्या, हेच नडतय, जो तो फक्त अशी घटना झाल्यावर असच बोलतोय… म्हणजे आमच्या भाषेत निषेध नोंदवतोय.. पण करायचं काहीच नाही… हा मातर अशा महिला दिनाचे स्टंट जरूर करायचे …
भग्या : शिवरायांच्या काळात शत्रू सैन्याकडील महिला देखील स्वराज्यात सुरक्षित होती, इथं आपल्याच घरात आपलीच मायबहीण सुरक्षित नाही… अन आपण कसल्या महिला दिन साजरा करायच्या बाता करतो… खरं तर आजही महिला ‘दीन’च आहेत…

संत्या : खरं हाय, आपल्या घरातूनच महिला सक्षमीकरणाची सुरवात करणे गरजेचे आहे…महिला सुरक्षा या एकाच दिवशी नाहीतर ३६५ दिवशी झाली पाहिजे… अशी यंत्रणा तयार करावी लागेल… नुसती कागदोपत्री अभियान न राबविता त्याची अमंलबजावणी झाली पाहिजे… तेव्हाच खरा महिला दिन असेल..!
तुक्या : व्हय.. चला तयारीला लागूया… या होळीला समाजातील दुर्गुणांची होळी करूया… महिला सक्षमीकरणाला हातभार लावूंया….

Deshdoot
www.deshdoot.com